टोमॅटोचा ट्रक उलटला, चालक जागीच ठार
By Admin
टोमॅटोचा ट्रक उलटला, चालक जागीच ठार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 08 मे 2021
चंदनापुरी घाटातील अपघात प्रवण क्षेत्रात ही घटना घडली असून चालक जागीच ठार झाला आहे.
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटातील अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या खिंडीत टोमॅटो घेवून नाशिककडे भरधाव वेगाने चाललेल्या मालट्रकच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात, चालक जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. विष्णू पांडुरंग उंबरे ( वय 35 ) रा. गोरडगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक असे मृत वाहन चालकाचे नाव आहे.
या बाबत महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वरील चंदनापूरी घाटातील खिंडीजवळच्या धोकादायक वळणावर दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला.
हे क्षेत्र अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून टोमॅटोचे क्रेट भरलेला मालवाहू ट्रक ( एमएच. 15 जीव्ही. 3198 ) नाशिकच्या दिशेने जात होता. खिंडीतील उतारावर भरधाव वेगाने जाताना, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मालट्रक दुभाजकावर आदळून उलटला. या अपघातात चालक अपघातग्रस्त वाहनाखाली दबल्याने जागीच मृत्यूमुखी पडला. तर सर्व महामार्गावर टोमॅटोचा खच पडला होता.
या घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरवात केली. हिवरगाव पावसा येथील क्रेन बोलावून ट्रकखाली अडकलेला चाकलाचा मृतदेह बाहेर काढला. वाहनाचे मालक दत्तात्रेय बाळासाहेब हरक यांना मोबाईलवर घटनेची माहिती दिली असता, त्यांनी चालकाचे नाव सांगितले.
मृतदेह बाहेर काढून घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवण्यात आला असून, याबाबत तालुका पोलिस ठाण्याला माहिती कळवली आहे. या अपघातामुळे नाशिककडे जाणारा मार्ग बंद असून, वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

