मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडले,शेतकऱ्यांना दिलासा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी -19 मे 2021,बुधवार
राहुरी तालुक्यासाठी शेती पिकासाठी महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून ३०० क्युसेस वेगाने तिसरे आवर्तन सोडण्यात आले. दरम्यान, २६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा निम्मा राहिला आहे.
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी तिसरे आवर्तन सोडण्यात आले असून हे आवर्तन सुमारे १८ दिवस चालणार आहे. पाणी सोडल्याने सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मुळा धरणात सध्या १२ हजार ९८० दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक असून त्यापैकी ८ हजार ४८० इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तर उजव्या कालव्यातून देखील शेतीसाठी पाणी सुरू आहे. त्यातून सुमारे पाच हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपयोगात येणार आहे. मुळा धरण सलग तीन वर्षापासून पूर्ण क्षमतेने भरले आहे. यंदा मुळा धरणात वाढीव पाणीसाठा दीड हजार दशलक्ष घनफूट शिल्लक राहणार आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.