'या' तालुक्यातील साखर कारखान्याचे आजपर्यंत १३ लाख मेट्रिक टनाचे गाळप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी -12 एप्रिल 2021, मंगळवार
संगमनेर तालुक्यातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने गुणवत्तेची परंपरा कायम राखत १९० दिवसांमध्ये विक्रमी १३ लाख १३ हजार ३२० मेट्रिक टनाचे गाळप केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.
ओहोळ म्हणाले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढील ५० वर्षांचा विचार करून अत्यंत दूरदृष्टीने घेतलेल्या ५ हजार ५०० मेट्रिक टन व ३० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाचा निर्णय हा अत्यंत लाभदायी व राज्याला दिशादर्शक ठरला आहे. २०२०-२१ या चालू हंगामात कारखान्यासाठी अत्यंत अडचणी होत्या. ऊसाचे विक्रमी उत्पादन, कोरोनाचे संकट, लॉकडाऊनचा प्रश्न, साखरेचे कमी झालेले भाव या सर्व पार्श्वभूमीवर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने आपला लौकिक कायम ठेवताना ६ हजार मेट्रिक टनाचे गाळप क्षमता असताना विक्रमी १३ लाख १३ हजार ३२० मेट्रिक टन इतके गाळप केले आहे.
यापूर्वी या कारखान्याने ११ लाख ५३ हजार मेट्रिक टनाचे गाळप केले होते तो उच्चांक यावर्षी मोडीत काढला आहे. तसेच नव्याने सुरू केलेल्या डिस्टलरी प्रकल्पातून ९२ लाख लिटरचे उत्पादन झाले आहे. तर विद्युतनिर्मितीतून ५३ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. या सर्व कार्यकाळात राज्यभरातील कारखान्यांमधून ऊस गाळपामध्ये पहिल्या पंधरा मध्ये थोरात कारखाना अग्रभागी राहिला आहे.