महाराष्ट्र
तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची गरज - कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
By Admin
तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची गरज - कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
कृषीमंत्र्यांच्या हस्ते अकोले येथे कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
अकोले(प्रतिनीधी)-
शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी स्थानिक युवकांनी एकत्र येत तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची गरज आहे, अशा प्रदर्शनांना शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
अकोले येथे विठ्ठल लॉन्स येथे आयोजित कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपराव शिंदे, आबासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, ॲड वसंतराव मनकर , अगस्ति कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश नवले, द्राक्ष बागायतदार संघटनेचे कैलासराव भोसले, पाणी फाऊंडेशनचे अविनाश पोळ, कळस तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नामदेव निसाळ, छत्रपती युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष संदीप वाकचौरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कृषीमंत्री श्री.कोकाटे म्हणाले, आतापर्यंत कृषी अवजारांची प्रदर्शने पाहिली आहेत. आज प्रथमच प्रत्यक्ष पीकांच्या शेतीसह असलेले प्रदर्शन पहात आहे. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून तरूणांना शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे ज्ञान प्राप्त होते. आज महाराष्ट्रात एका पीकांचे वेगवेगळे २०० प्रकारांच्या वाणांचे संशोधन झाले आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाला पाहिजे यावर शासनाचा भर आहे. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आली पाहिजे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
तरूणांना शेती क्षेत्राकडे वळविण्यासाठी या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक खत व बियाणे न वापरता, प्रमाणित केलेली खते व बियाणे अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी केली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांनी नकारात्मक होऊन खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही ना. कोकाटे यांनी यावेळी दिली.
रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना पिकानुसार मजुरीचा खर्च देण्याबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांशी चर्चा करून याबाबत चांगला निर्णय घेण्याचे ना. कोकाटे यांनी सांगत शेतकऱ्यांना फसविणाऱ्या बियाणे, खते, औषध्याच्या कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशारा ना.कोकाटे यांनी दिला. बियाणे, औषधाचे किंमती बाबद वास्तविकता तपासण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमानंतर कृषीमंत्र्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देत पिकांच्या नवनवीन वाणांची माहिती जाणून घेतली.
प्रास्ताविक व स्वागत कळस कृषी प्रदर्शन समितीचे संयोजक सागर वाकचौरे यांनी केले. सूत्रसंचालन सदानंद चव्हाण यांनी केले तर आभार कळस चे माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले.
Tags :
3748
10