महाराष्ट्र
19306
10
चौदा (१४) वर्षे वयापर्यंतच्या मुलींना कर्करोगप्रतिबंधक लस देण्याचा विचार
By Admin
चौदा (१४) वर्षे वयापर्यंतच्या मुलींना कर्करोगप्रतिबंधक लस देण्याचा विचार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यात महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कर्करोगाला रोखण्यासाठी 0 ते 14 वर्षे वयोगातील मुलींना मोफत कर्करोग प्रतिबंधक लस देण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे.
आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागासह सर्व विभागांची मंजुरी घेऊन लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 या वयोगटातील मुलांच्या विशेष तपासणी मोहिमेची सुरुवात आणि राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, आरोग्य विभागााचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते. तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे ऑनलाइन उपस्थित होते.
पवार म्हणाले, बालकांचे आरोग्य एखाद्या कुटुंबापुरते मर्यादित नसून ते समाज, देशाच्या उज्ज्वल भविष्याकरिता महत्त्वाचे असते. त्यामुळे राज्यातील बालके सुदृढ असली पाहिजेत. त्याचे आरोग्य चांगले असले पाहिजे. अभ्यासात प्रावीण्य मिळवले पाहिजे. या पद्धतीने सुदृढ व जबाबदार नागरिक घडविण्याचे काम केले पाहिजे. बालकांना जन्मजात कुपोषण, नेमिया, डोळे व दातांचे आजार, हृदरोग, कुष्ठरोग आदी प्रकारचे आजार असतात. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
मोहिमेच्या माध्यमातून अशा बालकांवर शासकीय रुग्णालय, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे वेळेत उपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने गरजू बालकांना मोठ्या प्रमाणावर याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
या योजनेंतर्गत 6 हजार शाळांमधील 14 लाख विद्यार्थी आणि 30 हजार अंगणवाडीतील 20 लाख बालकांची डोक्यापासून ते नखापर्यंत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या माध्यमातून बालकांच्या आरोग्याविषयी माहिती मिळणार आहे.
प्रकाश आबिटकर म्हणाले, शहरी आणि ग्रामीण भागात कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने हा चिंतेचा विषय आहे. महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग वाढत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी आता लस उपलब्ध झाली आहे. राज्यातील 0 ते 14 वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येणार आहे.
दादा भुसे म्हणाले, आरोग्य आणि शिक्षण विभागातर्फे शालेय मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या उपक्रमांपैकी आरोग्य तपासणी हा महत्त्वाचा उपक्रम आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करताना आरोग्य आणि शालेय शिक्षण विभागामध्ये अधिक समन्वय होणे आवश्यक होते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डावीकडून गजानन पाटील, जितेंद्र डुडी, प्रकाश आबिटकर आणि राजेंद्र भोसले.
Tags :

