समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला होणार
By Admin
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला होणार; मुंबई ते नागपूर प्रवास जलद
इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा पुर्ण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या मार्गाची आता अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत.
आता समृद्धी महामार्गाचा शेवट होतो, त्या आमने येथून पुढे नाशिक मार्गावरील वडपेपर्यंतची कनेक्टरची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण होताच हा ७६ किमी लांबीचा शेवटचा टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट असलेल्या ठाण्यातील खर्डी येथील एका जवळपास १.५ किमी लांबीच्या पुलाचे काम बाकी होते. तसेच समृद्धी महामार्गाचा शेवट होतो त्या आमने येथून पुढे वडपे येथे जाण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण होते.
भागात असलेल्या गाेडाऊनची जागा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक होती.
ही जागा मिळण्यात येणाऱ्या अडचणी, तसेच सततच्या पावसामुळेही कामे लांबली होती. मात्र आता पावसाळा संपल्यानंतर एमएसआरडीसीकडून ही कामे जलदगतीने पूर्ण केली जात आहेत. महिनाभरात ही कामे पूर्ण होतील, अशी माहिती एमएसआरडीसीतील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीला हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो. त्यानंतर मुंबईपर्यंतचा प्रवास सुकर होणार आहे.
गेल्या वर्षी सुरू झाला होता तिसरा टप्पा -
समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा जवळपास ८० कि.मी. चा मार्ग सुरू करण्यात आला होता. गेल्यावर्षी वर्षी तिसऱ्या टप्प्यात एमएसआरडीसीने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २३ किमीचा मार्ग सुरू केला होता. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूरवरून निघालेली वाहने थेट इगतपुरीपर्यंत विनाअडथळा पोहोचत आहेत. महिनाभरात या वाहनांना मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होणार आहे.
आमने ते वडपे कनेक्टर असा असेल -
समृद्धीवरून आमने येणाऱ्या वाहनांना नाशिक रस्त्याला वडपे येथे येऊन पुढे मुंबईपर्यंतचा प्रवास करावा लागेल. त्यासाठी प्रत्येकी चार लेनचा आणि ४.८ किमी लांबीचा रस्ता एमएसआरडीसीकडून उभारला जात आहे. हा रस्ता मुंबई - वडोदरा एक्स्प्रेसवेचा भाग आहे. त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरील एका ओव्हरपासच्या ॲप्रोचचे काम सध्या सुरू आहे.
संपूर्ण ७०१ किमी लांबीचा मार्ग वाहतूक सेवेत येणार -
हा टप्पा खुला झाल्यानंतर मुंबई- नागपूर हा प्रवास अधिक जलद होईल. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होणार आहे. तसेच या महामार्गाचा संपूर्ण ७०१ किमी लांबीचा मार्ग वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा शेवटच्या टप्प्यातील मार्ग खुला केला जाणार होता.

