गतिरोधक व दिशादर्शक फलक बसवावेत-मा. नगरसेवक प्रविण राजगुरू
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना निवेदन
पाथर्डी प्रतिनिधी:
शहरातील शेवगाव रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते खेर्डा फाटा पर्यंत आवश्यक ठिकाणी गतिरोधक व दिशादर्शक फलक बसवण्याची मागणी माजी नगरसेवक प्रविण राजगुरू यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,गेल्या काही वर्षापासून शेवगाव रोड येथे दुतर्फा बाजारपेठ वाढत आहे.नवीन बस स्थानक,सर्वच राष्ट्रीय बँका,मंगल कार्यालय,लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे जॉगिंग पार्क व इतर सर्वच प्रकारची दुकाने दोन्ही बाजूने थाटली गेली आहेत.यामुळे शेवगाव रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे.मात्र या रोडवर कुठेही गतिरोधक व दिशादर्शक फलक नसल्याने अनेकदा छोटे - मोठे अपघात घडत आहेत.
विशेष म्हणजे सकाळी व संध्याकाळी पायी फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे.नुकताच प्रतिष्ठित व्यापारी विजयकुमार लूनावत यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आपण तात्काळ गांभीर्याने दखल घ्यावी व आवश्यक ठिकाणी गतिरोधक व दिशादर्शक फलक बसवावेत,अशी मागणी करण्यात आली आहे.