गणेश मुर्तीच्या उंचीला मर्यादा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी महापालिका व स्थानिक प्रशासन यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने गणेश मंडळांना लवकरात लवकर मंडप परवानगी मिळण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली.
श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरीता 4 फुट उंच व घरगुती गणपती करीता 2 फुटापर्यत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेश मूर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडू मातीची पर्यावरण पुरक असल्यास मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे, असे आवाहन महापौर शेंडगे यांनी केेले आहे. गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्त यांचेकडील नोंदणी प्रमाणपत्र, संबंधीत पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखेचा नाहरकत दाखला, हे दाखले घेवून महापालिकेत अर्ज दाखल करावा. महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखला, नगररचना विभागाकडील नाहरकत दाखला, बांधकाम विभागाकडील नाहरकत दाखला हे एकाच जागेत देण्याची व्यवस्था करण्यात आलेली असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.