महाराष्ट्र
अतिवृष्टी झालेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन
By Admin
अतिवृष्टी झालेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन
पाथर्डी- प्रतिनिधी
अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंदी घेऊन पंचनामे करावेत, झालेल्या नुकसानीची तातडीने मदत मिळावी, अन्यथा कोरडगाव येथे रास्ता रोको करणार असल्याबाबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र म्हस्के व जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी पाथर्डी चे नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ यांना दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यांमध्ये गेल्या एक महिन्यापासून अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्यात शेतीचे, घराचे व इतर प्राण्यांची प्राणहानी व इतर संपत्तीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. गेल्या एक महिन्यापासून सरकारी पातळीवर छातुर मातुर पंचनामे करण्याशिवाय नुकसान ग्रस्तांची कुठल्याही प्रकारची ठोस अशी कार्यवाही झालेली नाही. सरकारी पातळीवरची कुठलीही मदत मिळालेली नाही. अतिवृष्टीमुळे झालेले पंचनामे करण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांना चुकीच्या नोंदणी घेण्यास भाग पाडले आहे. नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांनाची वस्तुनिष्ठ नोंदी घ्याव्यात. पुरग्रस्तासाठी वेगवेगळया गावात धान्य वाटपामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे घोटाळे झालेले आहेत. कोरडगाव येथील खंडोबा नगर येथे जाण्यासाठीचा रस्ता राहिलेला नाही. गावातील संपूर्ण गटार योजना ही निकामी झाली असून गटारीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे गावांमध्ये घाणीचे साम्राज्य झालेले आहे. खंडोबानगर व भिल्लवस्ती येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन उद्ध्वस्त झाली असून खंडोबानगर येथे व भिल्ल वस्ती येथे नवीन पाईप लाईन एकूण पिण्याचे पाण्याची सोय करण्यात यावी.
पाथर्डी तालुक्यामध्ये चांदगाव, माळेगाव, निपाणी जळगाव, पागोरी पिंपळगाव, औरंगपूर, मुखेकरवाडी, कोळसांगवी, कळसपिंपरी, तोंडोली तोंडोळी, तोंडोळीतांडा, जिरेवाडी, खंडोबावाडी, आगसखांड, वाळुंज इत्यादी गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसामुळे हानी झालेली असून, त्या लोकांचे जीवनमान धोक्यात आलेली आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे, तरी यावर विचार होऊन संबंधित गावांना मदत देण्यासाठी कार्यवाही व्हावी, अन्यथा येत्या सोमवारी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता कोरडगाव येथे शासनाच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, याची सर्वस्वी कायदेशीर जबाबदारी प्रशासनाची राहील.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद सोनटक्के, पाथर्डी तालुकाध्यक्ष रवींद्र (भोरे) म्हस्के, तालुका संघटक दत्ता अंदुरे आदींची उपस्थिती होती.
Tags :
49153
10