शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, अन्यथा उपोषण करु - आ.मोनिका राजळे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव, पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे व दररोज होणाऱ्या पावसामुळे हजारो एकरावरील पिके वाया गेली. शेतात पुराचे पाणी शिरून शेती खरडून गेली. वाड्या-वस्त्यावरील घरात व शहरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडेलत्ते यांचे नुकसान झाले. डोळ्यादेखत हजारो जनावरे पुरात वाहून गेली व मृत पावली. शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. या नुकसानीला दीड महिना उलटून गेला. मात्र शासनाने अजून एकही रुपयाची मदत नुकसानग्रस्तांना दिली नाही. अजूनही पाऊस सुरू असून सर्व महसूल मंडळातील शेतीपिके पाण्यात उभी असून शेतीपिके व फळबागांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत न दिल्यास नुकसानग्रस्तांसह भाजपचे सर्व आजी, माजी आमदार व खासदार व पदाधिकारी कोणतीही सूचना न देता आमरण उपोषण करतील, असा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी दिला. याबाबत त्यांनी आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री यांना पत्र देवून ही मागणी केली आहे.