राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात निदर्शने घोषणाबाजी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे शेतकर्यांना चिरडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकर्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्यासह नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले हाेते.
आमदार जगताप म्हणाले, उत्तरप्रदेशमध्ये लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेने लोकशाहीचा स्तंभ ढासळला. भांडवलदारांच्या हितासाठी कृषिप्रधान देशाची ओळख पुसण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. भाजप विरोधात बोलणार्यांमागे विविध चौकशीची ससेमिरा लावण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचा आराेपही त्यांनी केला.
बाळासाहेब जगताप, उबेद शेख, प्रा. अरविंद शिंदे, प्रकाश भागानगरे, रेशमा आठरे यांनी आपल्या भाषणात केंद्रातील भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, संपत बारस्कर, प्रकाश भागानगरे, अमोल गाडे, बाळासाहेब जगताप, अभिजीत खोसे, संजय झिंजे, काँग्रेसचे उबेद शेख, प्रा. अरविंद शिंदे, रेशमा आठरे, अंजली आव्हाड, अजिंक्य बोरकर, गणेश बोरुडे, मारुती पवार, सारंग पंधाडे, मुजाहिद कुरेशी आदी सहभागी झाले होते.