Breaking-'या' ठिकाणी आगीत एका महिलेचा भाजून मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
वैशाली विठ्ठल नन्नवरे (वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे. (Ahmednagar Fire Accident Women Death)
घरामध्ये अचानक लागलेल्या आगीत एका महिलेचा भाजून मृत्यू झाला आहे. शहरातील सावेडी भागातील महावीरनगरमध्ये सोमवारी (ता. 28) दुपारी दोन वाजता ही घटना घडली.
महावीरनगर भागामधील एका घरातून सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला धूर येऊ लागला. शेजारील रहिवाशांना धूर कोणत्या कारणामुळे येतो, याचा अंदाज आला नाही. त्यांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला ही माहिती दिली. अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ हे अग्निशमन दलाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, या आगीमध्ये वैशाली नन्नवरे या गंभीर भाजल्या होत्या. त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान सोळंके हे या पथकासह दाखल झाले. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे पथकही बोलविण्यात आले होते. तोफखाना पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.