महाराष्ट्र
61
10
आदर्श शिक्षिका माजी मुख्याध्यापिका कै. निर्मलाताई मेहंदळे
By Admin
आदर्श शिक्षिका माजी मुख्याध्यापिका कै. निर्मलाताई मेहंदळे
पाथर्डी - प्रतिनिधी
शिक्षण संस्था हे समाज परिवर्तनाचे केंद्र असते. अशा शिक्षण संस्थेचा प्रमुख हा समाज परिवर्तनाचा पाईक असतो.शिक्षणाचा आशय, शिक्षणाची व्याप्ती, शिक्षणाचा समाजाशी येणारा संबंध ही सर्व कौशल्य अंगी असणाऱ्या माझी शाळा- माझी आई समजणाऱ्या 'आदर्श शिक्षिका' म्हणजे श्री तिलोक जैन विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका कै. निर्मलाबाई मेहंदळे.
मेहंदळेबाईंचा जन्म १५/७/१९२२ रोजी खानदेशात पिंपळनेर या गावी सुविद्य घराण्यात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव कुमारी कृष्णा मुकुंद नित्सुरे असे होते. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कमलाबाई गर्ल हायस्कूल धुळे येथे झाले. खानदेशात त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. एक आदर्श विद्यार्थिनी म्हणून त्यांना गौरविण्यात आले. फर्ग्युसन कॉलेजमधून संस्कृत ,अर्धमागधी हे विषय घेऊन प्रथमवर्ग बी.ए. ऑनर्स झाल्या. महाविद्यालयांमध्ये खो-खो संघाच्या नायिका , रिंग ,टेनिस मध्ये विविध प्रकारची बक्षिसे मिळवली. त्या होस्टेलच्या सेक्रेटरी होत्या. विविध प्रकारची कौशल्य आणि ज्ञानाच्या आधारावर त्यांचे ज्या ठिकाणी शिक्षण झाले, त्याच ठिकाणी म्हणजे कमलाबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये त्यांना शिक्षिकेची नोकरी मिळाली.तीन वर्ष नोकरी होताच त्यांचा विवाह १ मे १९४५ रोजी श्री तिलोक जैन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कै. प.पु. मेहंदळे यांच्याशी झाला. प्रथम त्यांनी पनवेल येथे खाजगी शिकवण्या घेतल्या आणि १ मार्च १९४९ पासून श्री तिलोक जैन विद्यालयात शिक्षिका म्हणून सेवेत रुजू झाल्या.
शिक्षणाचे धडे देत असतानाच १९५० साली एस.टी.सी.व हिंदी परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या.१ ऑगस्ट १९७७ रोजी त्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका झाल्या.
त्यांची बोलण्याची, वागण्याची पद्धत अतिशय प्रेमळ आणि शांत होती. प्रभावी अध्यापनाची त्यांची शैली होती. त्यांच्या व्याख्यानाचा प्रभाव जनसामान्यांपर्यंत पोहचत असे. शिक्षणाबरोबरच खेळांच्या स्पर्धा,सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले वातावरण त्यांनी विद्यालयात निर्माण केले. अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्री तिलोक जैन विद्यालयाला मानाचे स्थान प्राप्त करण्यामध्ये बाईंचे योगदान खूप मोठे आहे.
अलौकिक बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व, व्यासंगी वृत्ती व संस्कृत विषयावरील प्रभुत्व यामुळे त्या आदर्श शिक्षिका झाल्या.आजही विद्यालय या प्रभावी ज्योतीच्या प्रकाशामुळे प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. माझ्या त्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विनम्र अभिवादन.
- प्राचार्य अशोक दौंड
श्री तिलोक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथर्डी.
Tags :

