महाराष्ट्र
114009
10
अमृत पंधरवाडा अभियान ऊस तोडणी कामगारांची 100 टक्के नोंदणी होणार
By Admin
अमृत पंधरवाडा अभियान ऊस तोडणी कामगारांची 100 टक्के नोंदणी होणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त देश पातळी ते जिल्हा पातळीपर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा परिषदेनं देखील अमृत पंधरवाडा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांची (Sugarcane workers) 100 टक्के नोंदणी करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे 15 विभाग सहभागी होणार
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेकडून अमृत पंधरवाडा अभियान राबवण्यात येणार आहे. यात जिल्हा परिषदेचे 15 विभाग सहभागी होणार आहे. यातील समाजकल्याण विभाग हा जिल्ह्यातील 100 टक्के ऊस तोडणी कामगारांची नोंदणी करणार आहे. तर रोजगार हमी विभाग झेडपीच्या शाळा आणि अंगणवाड्या भोवती जैविक संरक्षक भिंती उभाणार आहे. तर जिल्हा परिषदेचा अर्थ विभाग जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरील 25 टक्के लोकल फंड, पीआरसी, एजी मुद्दे सादर करणार आहे. आरोग्य विभाग प्रधानमंत्री मातृत्ववंदन योजनेचा तिसरा टप्पा पूर्ण करणार आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हर घर जल योजनेत प्रत्येक तालुक्यातून किमान पाच गावात या योजनेचा लाभ देणार आहे. तर कृषी विभाग महाडिबीटीमार्फत वैयक्तिक लाभार्थ्यांचे कागदपत्रे 100 टक्के जमा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्वच्छतेच्या जन जागृतीसाठी रथ यात्रेचेही आयोजन
पशूसंवर्धन विभाग 50 पशू आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणार आहे. स्वच्छता विभाग 101 गावे आणि 1 तालुका ओडिएफ प्लस करणार आहे. तसेच गावोगावी स्वच्छतेच्या जन जागृतीसाठी रथ यात्रेचेही आयोजन करणार आहे. ग्रामपंचायत विभाग कामगारांना जेवणाची व्यवस्था करणे, स्थानिक निधी लेखा आक्षेप 25 टक्के निकाली काढणे, एकल महिलांची नोंदणी करणे असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदचा लघू पाटबंधारे विभाग जल शक्ती अभियानात किमान 45 बंधारे बांधून पूर्ण करणार आहे. तर बांधकाम विभाग किमान 100 शाळा, अंगणवाडी इमारतींना रेन वॉटर हॉर्वेस्टींग करणार आहे. जिल्हा परिषदेचा महिला बालकल्याण विभाग एकात्मिक बाल विकास प्रकल्पातंर्गत अंगणवाडी केंद्राचे अ, ब, क श्रेणी निश्चित करणार आहे. तसेच शुन्य ते सहा वर्षे वयातील सॉम आणि मॅम श्रेणीतील बालकांची आरोग्य तपासणी देखील करणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी प्रत्येक विभागाने घेतलेली जबाबदारी शंभर टक्के पार पाडावी, से आवाहन केले आहे. दिलेली जबाबदारी योग्य पार न पाडल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी दिला आहे.
Tags :

