महाराष्ट्र
नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा!
By Admin
नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा!
आजपासून आचारसंहिता लागू; निवडणूक कार्यक्रमही झाला जाहीर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
वेळोवेळी संधी मिळूनही राज्यातील इतर मागासवर्गाला राजकीय आरक्षण देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. त्यातच सत्तांतरानंतर पुन्हा एकदा ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा जमा होतोय असे वाटत असतांनाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे या सतराही जिल्ह्यातील निवडणूका आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाशिवाय होणार यावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले असून राज्य सरकारसह ओबीसी समाजाला मोठा धक्का बसला आहे. आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमात संगमनेरसह जिल्ह्यातील 9 नगरपरिषदा आणि नेवासा नगरपंचातीचाही समावेश आहे.
याबाबत राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या सतरा जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतींचा सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आजपासून (ता.08) या सर्व जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे म्हंटले आहे. राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान 17 मे रोजी न्यायालयाने राज्यातील जे जिल्हे मान्सून प्रभावित नाहीत व ज्या जिल्ह्यांतील पर्जन्यमानाचे प्रमाण तुरळक आहे अशा ठिकाणी तत्काळ निवडणूक कार्यक्रम राबविण्याचे व परिस्थितीनुरुप त्यात जिल्हाधिकार्यांनी बदल करण्याची सूचनाही या आदेशातून देण्यात आली आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने भारतीय हवामान खात्यातील तांत्रिक व वरीश्ठ अधिकार्यांशी चर्चा करुन राज्यातील 17 जिल्ह्यातील 77 तालुक्यांची निवड केली ज्या ठिकाणचा निवडणूक कार्यक्रम पावसामुळे बाधित होणार नाही. त्यानुसार या सतरा जिल्ह्यातील 92 नगर परिषदा व 4 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर या ब वर्ग नगरपरिषदांसह जामखेड, शेवगाव, देवळाली, पाथर्डी, राहाता व राहुरी या क वर्गातील नगरपरिषदा आणि नेवासा नगरपंचायतीचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आज बजावलेल्या आदेशानुसार 5 जुलैरोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून 20 जुलैरोजी वरील सतरा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन दाखल करावे लागणार असून त्यासाठी 22 जुलै सकाळी 11 वाजेपासून 28 जुलै दुपारी 2 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधीही वरीप्रमाणे असून अंतिम दिवशी 3 वाजेपर्यंत ते दाखल करता येतील.
29 जुलै रोजी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी होईल व 4 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर त्याच्या दुसर्या दिवशी चिन्ह वाटप करण्यात येईल. 18 ऑगस्टरोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रीया पार पडेल व 19 ऑगस्टरोजी मतमोजणी होईल विजयी उमेदवार जाहीर होतील. या प्रमाणे निवडणूक आयोगाने राज्यातील 17 जिल्ह्यातील 77 तालुक्यात असलेल्या 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कार्यक्रमात परिस्थितीनुरुप बदल करण्याची मुभा जिल्हाधिककार्यांना देण्यात आली आहे.
Tags :
400
10