महाराष्ट्र
सर्व रस्ते तातडीने दुरुस्तीचे जिल्हाधिका-याचे आदेश
By Admin
सर्व रस्ते तातडीने दुरुस्तीचे जिल्हाधिका-याचे आदेश
रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
प्रहारने सुचविलेले सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी आदेश दिल्याने दि.२२ सप्टेंबर रोजी होणारे प्रहारचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयासमोरील सदबुद्धी सत्यनारायण व जागरण गोंधळ तूर्तास स्थगित केले असल्याची माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी दिली.
रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीत प्रहारच्या मागणीची दखल न घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना डॉ. राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी यांनी फैलावर घेतले.
जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि त्यावर होणारे अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने वारंवार विनंती अर्ज करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहमदनगर येथील कार्यालयाच्या समोर सद्बुद्धी सत्यनारायण व जागरण गोंधळ कार्यक्रम घेणार असल्याचे निवेदन जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी दिले होते.त्या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी त्यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची शुक्रवारी बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये बोलताना जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे प्रश्न उपस्थित केले. या बैठकीस प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अप्पासाहेब ढूस, जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, प्रहार किसान आर्मीचे प्रमुख रघुनाथ आरगडे, रमेश भालके, नानासाहेब तागड, पाथरवाल्याचे सरपंच दत्तात्रय खाटीक आदी प्रहार कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये बैठकीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांनी प्रहारच्या निवेदनावर तात्काळ दखल न घेतल्याबद्दल ताशेरे ओढले
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी नगर-मनमाड रस्त्याचे टेंडर निघाले असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. त्याबद्दल काल मंत्रालयात बैठक संपन्न झाली असून एक महिन्यात हा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच पाथर्डीचा प्रस्तावही एक महिन्यात मार्गी लागेल.त्यांनी प्रहारच्या तक्रारींवर तात्काळ निर्णय करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन रोड सेफ्टीचे सर्व नियम पाळण्यास सांगितले. तसेच गॅस पाईपलाईन कामाची चौकशी करून ते नियमात कामे होतात किंवा कसे हे पाहण्याचेही आदेश दिले.त्याचबरोबर रस्त्याचे डिव्हायडर फोडल्याबद्दल संबंधितांवर तात्काळ कारवाई करून त्या डिव्हायडरची दुरुस्ती करण्याचे आदेशही दिले असता जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता राजगुरू यांनी ही बाब आमच्या कक्षेत येत नसल्याचे सांगितले असता जिल्हाधिकाऱ्यांनी जेसीबी चालक, पेट्रोल पंप चालक
किंवा इतर उद्योजक कुठलीही परवानगी न घेता अवैधरीत्या डिव्हाइडर फोडतील त्यांच्या समोरील रस्ता खोदण्याचे आदेश राजगुरू यांना दिले.
श्रीरामपूरचे आप्पासाहेब ढूस यांनी देवळाली प्रवरा ते टाकळीमिया या रस्त्याचे काम संदर्भात मुद्दा उपस्थित करून निवेदन दिले. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास प्रहारच्या मागणीतील सर्व रस्त्यांच्या बाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाध्यक्षांनी राहता-श्रीरामपूर तालुक्यातील सीमेवरील वाकडी फाटा ते गणेशनगर- एकरुखे हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक येथील कार्यालयाला सतत पाठपुरावा करून मंत्रालयातील रस्ते सचिवांकडे पाठवला असून दोन वर्ष होऊनही हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला जात नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांच्या लक्षात आणून दिली.तसेच नेवासा तालुक्यातील एकूण पंधरा रस्त्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून अवधी होऊन गेला मात्र नवीन रस्ते किंवा झालेल्या रस्त्यांना तीन-चार महिन्यातच खड्डे पडले. त्या रस्त्यावर वृक्षारोपण केल्यानंतर
सार्वजनिक बांधकाम विभागाने खडबडून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली असल्याची बाब सुरक्षा बैठकीत मांडली. नेवासा तालुक्यातील रस्ते व राहता तालुक्यातील वाकडी रस्ता कुलकर्णी यांनी रस्ता तातडीने वर्ग करून घेत असल्याचे सांगितले.
बाभळेश्वर-श्रीरामपूर-नेवासा रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत संबंधित श्रीरामपूरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन गुजरे यांना रस्त्याच्या चालू असलेल्या निकृष्ट कामाबाबत विचारणा करून रस्त्याच्या निविदेची मागणी केली असता त्यांनी कुठलीही माहिती न देता मी आमदाराचा नातेवाईक असल्याची बतावणी करत असल्याची बाब प्रहारचे नवाज शेख व आप्पासाहेब ढूस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असता जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध्यक्ष अभियंता कुलकर्णी यांना यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांला समज दिली.
Tags :
487
10