भालगावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची तहसीलदारांकडून पाहणी
पाथर्डी- प्रतिनिधी
अतिवृष्टीग्रस्त शेतीतील पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर यांनी पाथर्डी तालुक्यातील भालगाव, कासळवाडी व खरमाटवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी भेटून चर्चा केली व दिलासा दिला.
पाथर्डी तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसापासून परतीच्या पावसाने हाहाकार केला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून या झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली आहे.
अतिवृष्टीत मातीमोल झालेले कापूस व तूर पिकांचे प्रत्यक्ष नुकसान पाहिल्यावर बाधित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसान झालेल्या भागातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. शासन व प्रशासन तुमच्या पाठीशी आहे, असे म्हणत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.
मागच्या काही दिवसापासून तालुक्यात सतत पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी तूर, कापूस या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली असून तहसीलदार यांनी या परिस्थितीत नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
विविध ठिकाणी केलेल्या पिकांच्या पाहणीच्या वेळी तहसिलदार श्याम वाडकर, कृषी पर्यवेक्षक सुनिल देखणे, माजी सरपंच अंकुश कासुळे, अशोक खरमाटे, अंबादास (बंटी) खेडकर, अशोक खेडकर, संभाजी खेडकर, गणेश सुपेकर, उद्धव आप्पा खेडकर, सुरेश चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, तुकाराम खेडकर, एकनाथ खेडकर, तलाठी वशिम पटेल यांच्यासह महसूलचे कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.