Breaking-'या' ठिकाणी एकाच्या डोक्यात दगड घातला मध्यरात्री दरोडेखोरांचा प्रचंड धुमाकूळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अमृत काकासाहेब पवार यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा घातला. यात बाहेर झोपलेले अमृत पवार यांच्या डोक्यात मोठा दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पवार हे गंभीर जखमी आहेत.
भोयरे गांगर्डा येथे गुरूवारी मध्यरात्री दोन वाजता दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला.
अहमदनगर जिल्ह्यात चोरी-दरोडे आदी घटना सातत्याने वाढत चालल्याचे दिसत आहे. नुकताच चांद्यात दरोडेखोरांनी अक्षरशः नंगानाच करत प्रचंड दहशत निर्माण केल्याची घटना ताजी आहे.
सदर घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. समजलेली अधिक माहिती अशी: भोयरे गांगर्डा येथील अमृत पवार जेवण करून घराबाहेरील पडवीत झोपले होते.
मध्यरात्री दोनच्या सुमारास साधारण चार - पाच चोरट्यांनी बाहेर झोपलेले अमृत पवार यांच्या डोक्यात मोठा दगड घातला. बाहेर कशाचा आवाज आला म्हणून त्यांच्या पत्नीने घराचा दरवाजा उघडला.
यादरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या पत्नीने आरडाओरडा करायला सुरुवात केली असता त्यातील दोघांनी त्यांच्या डोक्यात जोरदार काठीचा फटका मारला व एकाने हातावर काठी मारली असता त्याचा हात मोडला. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून घेतले.
दरम्यान त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणारे जागे झाले. मग चोरट्यांनी तेथून पोबारा केला. नागरिकांनी तात्काळ सुपा येथील पोलिसांना झालेल्या घटनेची माहिती दिली.
पोलीसांसह नागरिकांनीही या ठिकाणी धाव घेतली. अमृत पवार यांना प्राथमिक उपचारासाठी सुपा येथे हलविण्यात आले. मात्र मार जास्त लागल्याने त्यांना नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत हे वाढलेले चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण पोलिसांसमोर आवाहन उभे करत आहे. नागरिकांमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.