देवीच्या कुमारिका पूजेला मुलीचा नकार; आईने विचारातच मुलीने सांगितली धक्कादायक घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील उसतोडणी करणारी एक टोळी कर्नाटकमध्ये काम करून माजलगाव तालुक्यातील टालेवाडी तांडा येथे १६ एप्रिल रोजी कामासाठी आली होती. येथील शिवारातील एका उसाच्या फडात ऊस तोडणीचे काम सुरु होते. दरम्यान, ट्रॅक्टर चालक पमू कुरेने टोळीतील एका मजुराच्या अल्पवयीन मुलीवर शेतात नेऊन अत्याचार केला. तसेच कोणाला सांगितले तर तुझ्या आईला जीवे मारेल अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने याची कुठे वाच्यता केली नाही.
जीवे मारण्याची धमकी देत उसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर ट्रॅक्टर चालकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
देवीच्या कुमारीका पुजेसे नकार दिल्याने आईच्या चौकशीत एक महिन्यानंतर मुलीने अत्याचार झाल्याचे सांगितले. यावरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.१२) रात्री चालक पमू कुरे (रा.केंडे पिंपरी ता. वडवणी जि.बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी मुलीच्या घरी देवीची कुमारिका पूजा आयोजित केली होती. यावेळी मुलीने पूजा करण्यास नकार दिला. याचा जाब आईने विचारला असता मुलीने १६ एप्रिल रोजी टालेवाडी तांडा येथील शेतात ट्रॅक्टर चालक पमु कुरे याने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची आपबिती सांगितली. पिडीतेच्या आईने दिंद्रुड पोलीस स्टेशन गाठत चालक पमु कुरे विरोधात गुन्हा नोंद केला आहे. बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम, बलात्कार, ॲट्रॉसिटी अशा विविध कलमाअंतर्गत कुरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत करत आहेत.