महाराष्ट्र
शेततळ्यात आढळला विवाहितेचा मृतदेह, माहेरच्यांनी व्यक्त केला घातपाताचा संशय
By Admin
शेततळ्यात आढळला विवाहितेचा मृतदेह, माहेरच्यांनी व्यक्त केला घातपाताचा संशय
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अकोले निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतीश केरे असे मृत विवाहितेचे नाव आहे. रविवारी (दि. 22) दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात 'अकस्मात मृत्यू'ची नोंद करण्यात आली आहे.
निळवंडे येथील खंडोबा मंदिर शिवारात असलेल्या शेततळ्यात शीतल सतीश केरे ( वय 32) या विवाहित महिलेचा मृतदेह आढळला. शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी मृत शीतलचे सासरे संतू माधव केरे यांनी पोलिसांत खबर दिली. शीतल सतीश केरे ही कपडे धुण्यासाठी शेततळ्यावर गेले असता, पाय घसरून शेततळ्याच्या पाण्यात पडून बुडून तिचा मृत्यू झाल्याचे खबरीत म्हटले आहे. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात 'अकस्मात मृत्यू'ची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, या विवाहितेचा घातपात केल्याच्या संशयावरून माहेरचे नातेवाईक संतप्त झाले होते. शीतलचे माहेर राहाता तालुक्यातील लोणी बुद्रूक येथील आहे. तिचे वडील सुधाकर अंकुश म्हस्के व नातेवाईकांनी संगमनेर येथील नगरपालिका रुग्णालयात येऊन मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास विरोध नोंदविला. सासरच्या लोकांनी तिचा घातपात केल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी 'तुमची तक्रार घेतो; पण अंत्यविधी रोखू नका,' असे सांगताना तपासात दोषी आढळल्यास कायदेशीर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शीतलचा मृतदेह तिच्या सासरी निळवंडे येथील घरी आणण्यात आला. तिचा पती सतीश केरे, सासरा संतुजी केरे व इतर कुटुंबीय घराकडे फिरकले नाहीत. शीतलच्या मान, पाठ आणि पायावर काही खुणा दिसून आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
शीतलच्या कुटुंबीयांनी येऊन अंतिम संस्कार करावेत, असा आग्रह माहेरच्या लोकांनी धरल्याने तीन तास अंत्यसंस्कार खोळंबला होता. अखेर स्थानिक कार्यकर्ते आणि नातेवाईकांच्या मध्यस्थीने घराच्या अंगणातच शीतलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
Tags :
10996
10