महाराष्ट्र
पंख्यामध्ये वीजप्रवाह उतरल्याने त्याला चिटकून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू
By Admin
शेवगाव- पंख्यामध्ये वीजप्रवाह उतरल्याने त्याला चिटकून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे
स्टॅण्ड असलेला पंख्यामध्ये वीजप्रवाह उतरल्याने त्याला चिटकून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.26) सकाळी नऊच्या सुमारास घडली.
घरात कोणी नसल्याने सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
स्वाती शरद उर्फ बुगा ढवाण (वय 30) आणि गौरी शरद ढवाण (वय 2) अशी या मायलेकींची नावे आहेत. बोधेगाव येथील खिळे गल्लीत देविदास ढवाण हे त्यांचा मुलगा शरद उर्फ बुगा, सून स्वाती आणि दोन वर्षाची नात गौरी यांच्यासमवेत राहतात. देविदास ढवाण व त्यांचा मुलगा शरद हे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी मोलमजुरीच्या कामासाठी बाहेर गेले.
शरद हा गवंड्याच्या हाताखाली बिगारी म्हणून काम करतो. घरी शरदची पत्नी स्वाती व मुलगी गौरी या दोघीच होत्या. लहान गौरीला सांभाळत स्वाती घरकाम करत असताना सकाळी 9 वाजता लाईट आली. त्याच वेळेस घरातील स्टॅण्डचा उभा पंखा सुरू झाला. या पंख्यात वीजप्रवाह उतरलेला होता. त्याच दरम्यान स्वाती व गौरी यांचा या पंख्याला स्पर्श झाल्याने त्या पंख्याला चिटकून खाली कोसळल्या.
पंखा त्यांच्या अंगावर पडला. घरात आणि शेजारीही कोणीच नसल्याने, तसेच काहीच आरडा ओरडा न झाल्याने त्या दोघींचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. शेजारीच राहणारे शरदचे चुलते शिवा ढवाण हे सकाळी 11 च्या सुमारास घरी आले. तेव्हा त्यांच्या लहान मुलीने त्यांना गौरी व स्वातीकाकू पंखा अंगावर घेऊन झोपली असल्याचे सांगितले. त्यांनी शरदाच्या घरात डोकावून पाहिले असता, स्वाती व गौरी यांच्या अंगावर पंखा पडलेला होता आणि त्या शांत पडलेल्या होत्या.
शिवा ढवाण यांनी पंख्याचे बटन बंद करून पिन काढली. नंतर घडलेला प्रकार लक्षात आला. दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच बोधेगाव पोलिस दूर क्षेत्राचे सहायक फौजदार भगवान बढदे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना माहिती दिली. त्यांचे कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मायलेकींचे मृतदेह उत्तरिय तपासणी साठी शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे, धनगर समाजाचे युवा नेते काशीनाथ काळे यांनी यावेळी मदत कार्य केले. या दुर्दैवी घटनेने बोधेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Tags :
14614
10