ग्रामपंचायती मालामाल! पंधराव्या वित्त आयोगाचा 63 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
By Admin
ग्रामपंचायती मालामाल! पंधराव्या वित्त आयोगाचा 63 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्ह्यासाठी 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत बंधित निधी म्हणून 63 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये ग्रामपंचायतींसाठी 50 कोटी 86 लाखांचा दुसरा हप्ता वर्ग करण्यात येणार आहे.
या निधीमुळे आता ग्रामपंचायती मालामाल होणार असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात 1316 ग्रामपंचायती, तर 14 पंचायत समिती आहेत.
केंद्राच्या 15 व्या वित्त आयोगानुसार बंधित आणि अबंधित अशा दोन प्रकारात विकास कामांसाठी निधी दिला जातो. 12 जुलैच्या आदेशान्वये 2020-21 मधील दुसर्या टप्प्यातील बंधित निधीचा हप्ता वर्ग करण्यात येणार आहे. त्यात एकूण निधीपैकी जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी 10 टक्के तर उर्वरित 80 टक्के रक्कम ही थेट ग्रामपंचायतींच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुमारे 6 कोटी, तर ग्रामपंचायतींसाठी 50 कोटी 86 लाखांची रक्कम मिळणार आहे.
निधीचा वापर कोठे होणार?
बंधित अनुदानाचा वापर हा पायाभूत सेवांसाठी करायचा आहे. यामध्ये स्वच्छता आणि हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थिती कायम राखणे, तसेच देखभाल व दुरुस्ती करणे. तसेच पेयजल पाणीपुरवठा, जल पुनर्भरण, पावसाच्या पाण्याची साठवण (रेन हार्वेस्टिंग) जल पुन: प्रक्रिया (वॉटर रिसायकलिंग) यासाठी करणे बंधनकारक आहे.
पहिला हप्ता 75 कोटी
जिल्ह्यासाठी पहिला हप्ता हा सुमारे 75 कोटींचा मिळाला होता. यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी 7 कोटी 57 लाख 45 हजार आणि 1316 ग्रामपंचायतींना 60 कोटी 59 लाख 57 हजारांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र, दुसरा हप्ता हा एकूण 63 कोटींचा मिळाल्याने यात कपात का झाली? हे मात्र समजू शकले नाही.
तालुका ग्रामपंचायत पंचायत समिती
अकोले 3,86,86,738 49,38,454
संगमनेर 6,00,10,522 74,17,822
कोपरगाव 3,31,11,101 40,06,000
राहाता 3,72,66,565 44,31,437
श्रीरामपूर 2,81,78,592 33,93,431
राहुरी 3,59,68,222 44,13,794
नेवासा 4,79,80,132 58,69,696
शेवगाव 2,94,752,29 36,96,587
पाथर्डी 3,28,24,365 41,58,508
जामखेड 1,68,92,692 22,22,031
कर्जत 3,09,39,046 40,61,956
श्रीगोंदा 4,04,92,875 51,53,564
पारनेर 3,71,10,474 49,19,166
नगर 3,97,31,469 50,50,409
पंचायत समिती ः 6 कोटी 37 लाख 33 हजार
जिल्हा परिषद ः 6 कोटी 37 लाख 33 हजार
ग्रामपंचायत ः 50 कोटी 86 लाख 68 हजार