तीन महिन्यांनंतर कांदा पुन्हा पाच हजार रूपये
अहमदनगर-
गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याचे भाव पुन्हा वाढू लागले असून तीन महिन्यानंतर आता पुन्हा कांदा पाच हजार रूपयांपर्यंत गेला आहे. नगर बाजार समितीत शनिवारी झालेल्या कांदा लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला साडेचार ते पाच हजार रूपयांचा भाव मिळाला. शनिवारी लिलावासाठी एकूण ४३ हजार ४४० गोण्या (२३८९२ क्विंटल) कांद्याची आवक झाली.सध्या गावरान कांदा बाजारात येत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी गावरान कांदा दहा हजारांपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी लाल कांद्याचीही मोठी आवक बाजारात होत होती. पुढे लाल कांद्याची आवक वाढल्यानंतर कांद्याचे भाव घसरून २ ते ३ हजारांपर्यंत खाली आले. सध्या लाल कांद्याची आवक बंद होऊन आता गावरान कांद्याची आवक होत आहे.
मध्यंतरी १ लाख कांदा गोण्यांपर्यंत गेलेली आवक भाव पडल्याने कमी होत गेली. सध्याही केवळ ४० ते ४५ हजार गोण्यांची आवक होत आहे. शिवाय इतर राज्यांत कांदा उत्पादन कमी असल्याने महाराष्ट्रातील कांदा बाहेर जाऊ लागला आहे. परिणामी पडलेल्या भावाने पुन्हा उचल खाल्ली असून कांदा तीन महिन्यानंतर पुन्हा पाच हजारांपर्यंत गेला आहे. आवक आणखी कमी झाली तर आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे.
शनिवारच्या लिलावातील भाव
प्रथम प्रतवारी ४५०० ते ५०००
द्वितीय प्रतवारी ३५०० ते ४५००
तृतीय प्रतवारी २२०० ते ३५००
चतुर्थ प्रतवारी १००० ते २२००