शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हाभर आंदोलन छेडणार - अंकुशराव डांभे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असताना नगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडून महावितरणकडून वीजबिल वसुली करून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे.
उच्च न्यायालयाचा आदेश असून सुध्दा महावितरणकडून वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा सुरू झाला आहे. तो त्वरित थांबविण्यात यावा व वीज पूर्णदाबाने सुरळीत देण्यात यावी अन्यथा नगर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी मराठा महासंघ तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा नगर जिल्हाध्यक्ष अंकुशराव डांभे पाटील यांनी दिला आहे.
वीज कनेक्शन तोडल्यामुळे स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ कृषिराज टकले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच पाथर्डी तहसीलदार शाम वाडकर यांना संघटनेचे शिष्टमंडळ भेटून निवेदन दिले.
या शिष्टमंडळात संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड, पाथर्डी तालुका अध्यक्ष रमेश शेळके, प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा संघटक विठ्ठल गायकवाड, प्रसिद्धीप्रमुख अमोलराजे म्हस्के, युवा नेते बंडू अकोलकर, सामजिक कार्यकर्ते परमेश्वर टकले, शरद केदार, राजेंद्र केदार व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नये असा आदेश प्रशासनाला असून देखील वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचे तगादा लावला जात आहे. शेतकऱ्यांचे तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान जर झाले तर त्याचे नुकसान भरपाई शासन देणार का? असा सवाल जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे यांनी केला आहे.
तहसीलदार शाम वाडकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या भावना शासना पर्यंत पोहचवून योग्य तो न्याय दिला जाईल.