महाराष्ट्र
2190
10
ग्रामसेवकांची बायोमेट्रिक कागदावरच; ग्राम पंचायतीकडे दुर्लक्ष सीईओचेही लक्ष पोहचेना
By Admin
ग्रामसेवकांची बायोमेट्रिक कागदावरच; ग्राम पंचायतीकडे दुर्लक्ष सीईओचेही लक्ष पोहचेना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
एकही ग्रामपंचायत बायोमेट्रिक नाही !
गावातील ग्रामस्थांना वेळेत्त विविध दाखले मिळावीत, त्यांची प्रशासकीय कामे सहजगित्या व्हावीत, यासाठी ग्रामसेवकांनी वेळेत कार्यालयात येणे अपेक्षित आहे.
सर्वच ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याबाबत झेडपीतून तसे पत्र काढले होते. मात्र, या पत्राला 1300 ग्रामसेवकांनी केराची टोपली दाखवली आहे. कालअखेर 1318 पैकी केवळ 19 ग्रामपंचायतींमध्येच बायोमेट्रिक प्रणाली असल्याची माहिती पुढे आली आहे. मध्यंतरी गोविंद कामतेकर या ग्रामस्थाने मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले होते.
त्यात ग्रामसेवक, तलाठी हे वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात, त्यामुळे येणार्या अडचणी विशद केल्या होत्या. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेत विभागीय आयुक्तांना आदेश दिले होते. त्यानुसार नगर जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या 1318 ग्रामपंचायतींना बायोमेट्रिक प्रणाली बसविणे तसेच जनमाहिती अधिकारी व प्रथम अपलिीय अधिकारी यांचे नाव व पत्ता याबाबतचे नामनिर्देशक फलक बसविण्याच्या लेखी सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी केल्या होत्या.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतलेल्या आढाव्यात 1318 पैकी सर्वच ग्रामपंचायतींनी नावाचे फलक बसविले आहेत. मात्र यातील केवळ 19 ग्रामपंचायतींमध्येच बायोमेट्रिक प्रणाली सुरू असून, उवर्रीत 1299 ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी याकडे अक्षरशः दुर्लक्ष केल्याचे दिसले. बायोमेट्रीकबाबत शासनाचे स्पष्ट आदेश नसले, तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीत ही प्रणाली आहे, त्यामुळे ग्रामस्थांच्या सुविधेसाठी आणि गावच्या हितासाठी ग्रामपंचायतीमध्येही ही प्रणाली असावी, असाच स्थानिक सूर आहे. त्यामुळे प्रशासन बायोमेट्रीक बाबत शासन आदेशाची वाट पाहणार की, येथील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करून नगरपासूनच पायंडा पाडणार, याकडे लक्ष असणार आहे.
एकही ग्रामपंचायत बायोमेट्रिक नाही !
पारनेर, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर आणि अकोले या आठ तालुक्यांत एकाही ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली नाही. तर कोपरगाव, राहुरी तालुक्यात फक्त एक-एक ग्रामपंचायत बायोमेट्रिक असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागातून समजली.
विभागीय आयुक्तांच्या पत्राचाही विसर !
शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत शासनाने वेळोवेळी शासन निर्णय व परिपत्रके याव्दारे सूचना केल्या. यात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 2021 मध्ये बायोमेट्रीक प्रणालीबाबतही पत्र काढले होते. मात्र, या पत्राचाच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना विसर पडल्याचेही चित्र आहे.
अतिरिक्त जबाबदार्यांचा तीन विभागांवर परिणाम !
जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद हे सुरेश शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय सामान्य प्रशासन, स्वच्छता व पाणी पुरवठ या विभागाची जबाबदारी देखील शिंदे यांच्यावरच आहे. या अतिरिक्त जबाबदारीमुळे ग्रामपंचायत विभागाला वेळ देताना त्यांची कसरत होते. या तीनही विभागाच्या कामांवर अशा अतिरिक्त जबाबदारीचे परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या जबाबदारीचे विभाजन करावे, असा सूर काही माजी सदस्य आळवताना दिसत आहे.
पाठीमागे विभागीय आयुक्तांचे एक पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार खाली पत्र दिले असेल, मात्र किती ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक बसवले आहे, याबाबत माहिती घेवून कळवितो
-सुरेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत
Tags :

