महाराष्ट्र
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जळत्या लाकडाने मारहाण; अधीक्षक अश्विनकुमार पाईकराव निलंबित
By Admin
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जळत्या लाकडाने मारहाण; अधीक्षक अश्विनकुमार पाईकराव निलंबित
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अकोले : शासकीय आश्रमशाळेचे अधीक्षक अश्विनकुमार पाईकराव यांनी जळत्या लाकडाने पाच विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात जखमी मुलांच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्यावर आदिवासी विभागाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यातील शिरपुजे शासकीय आश्रम शाळेत ३ डिसेंबर रोजी सहा विद्यार्थ्यांनी लाकडे पेटवून शेकोटी केली होती. हा प्रकार अधिक्षक अश्विन पाईकराव यांनी पाहताच जळती लाकडे हातात घेऊन सहावी ते नववीच्या मुलांना मारहाण केली. त्यात काही मुलांच्या पायावर, पाठीवर आणि अन्य ठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्यानंतर पालकांनी मुलांना राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सदर घटनेची माहिती आमदार डॉ. किरण लहामटे यांना समजताच त्यांनी राजुर ग्रामीण रुग्णालयात जाऊन माराहाण झालेल्या विद्यार्थ्यांची चौकशी केली. तसेच अधीक्षक अश्विन पाईकराव यांना निलंबित करण्याची मागणी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे केली होती.
दरम्यान, राजूर पोलीस ठाण्यात पालक भाऊ शिवराम धादवड (वय-३२ वर्ष, रा. शिसवद) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अधीक्षक अश्विन पाईकराव यांच्या ताब्यातील मुलांनी मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून शाळेच्या आवारातील जुन्या गाद्या पेटवल्याचा राग आरोपी पाईकराव यांना आला. त्यानंतर त्यांनी युवराज भाऊ धादवड, अशोक संतू धादवाड, ओमकार भीमा बांबळे, गणेश लक्ष्मण भांगरे, बाबू संतू धादवड या पाच मुलास शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. या फिर्यादीवरून अश्विनीकुमार अर्जुनराव पाईकराव (रा. शासकीय आश्रम शाळा, शिरपुंजे) यांच्या विरोधात े गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुढे करत आहेत.
शिरपुजे शासकीय आश्रम शाळेचे अधीक्षक आश्विनकुमार अर्जुन पाईकराव यांनी सरनामा क्रमांक सहाच्या अहवालानुसार भंग करत कर्तव्यात कसूर केल्याने प्रथमदर्शनी जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन आश्विनकुमार पाईकराव यांना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केले आहे.- संदीप गोलाईत, अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
Tags :
34452
10