महाराष्ट्र
3731
10
कारचालकाचा अपघात की घातपात? मृतदेह आढळला 4 किमी अंतरावर
By Admin
कारचालकाचा अपघात की घातपात?
मृतदेह आढळला 4 किमी अंतरावर लटकलेल्या अवस्थेत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवडजवळ शुक्रवारी (दि.3) रात्रीच्या सुमारास एका कारचा अपघात झाल्याची घटना घडली. मात्र, कारच्या चालकाचा मृतदेह घटनस्थळापासून 4 किमी अंतरावर असलेल्या एका हॉटेलच्या शेडमध्ये फासावर नग्न अवस्थेत लटकेला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात की अजूनही वेगळे काही याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
आकाश मोहन खताळे (वय 24) रा. अंबड चिंचाळे असे मृत कारचालकाचे नाव आहे. घोरवड गावाजवळ रात्रीच्या सुमारास एक कार पुलाच्या कठड्याला धडकून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील विहिरीजवळ येऊन पडली. यामुळे कारचा पुर्णपणे चक्काचूर झाला. आज (दि.4) सकाळी स्थानिक नागरिकांनी याबाबत तात्काळ सिन्नर पोलिस ठाण्यात माहिती दिली असता समजताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हरिश्चंद्र गोसावी, पोलीस नाईक विनायक आहेर, गौरव सानप, निवृत्ती गीते, अंकुश दराडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कारमध्ये कुठलाही व्यक्ती आढळून न आल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले. त्यानंतर पोलिसांनी कारचालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, या चालकाचा मृतदेह तेथून चार किमी अंतरावर असलेल्या हॉटेल जयभवानी येथे रसवंतीच्या शेडच्या अँगलला फासावर नग्न अवस्थेत लटकलेला आढून आला. सुरुवातीला कारचालकाचा शर्ट घटनास्थळाजवळील डोंगराच्या पायथ्याशी सापडला होता. त्यानंतर कारचालकाचा मृतदेह तेथून चार किमीवर आढळल्याने पोलिसांसमोर मोठा पेच पडला. कारचालकने स्वत:च अपघात करुन घेत दुरवर येऊन गळफास घेवून आत्महत्या केल्याचाही संशय व्यक्त होत आहे. मात्र, अपघाताचा बनाव करुन आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करीत आहे. कारचालक आकाश हा पांढुर्ली येथे आपल्या नातेवाईकांकडे आला असल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी मृतदेह फासावरुन खाली उतरवत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या विचित्र घटनेने तालु्नयात खळबळ उडाली असून याबाबत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र गोसावी अधिक तपास करीत आहेत.
Tags :

