दादापाटील राजळे महाविद्यालयात ‘इमोशनल इंटेलिजन्स क्लब’ स्थापन
आदिनाथनगर : येथील दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ साठी ‘इमोशनल इंटेलिजन्स क्लब’ स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी दिली.
प्राचार्य डॉ. टेमकर म्हणाले की, आदरणीय आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या इमोशनल इंटेलिजन्स क्लब मधील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात भावनिकदृष्ट्या सक्षम होत आत्मविश्वासाने व्यक्तिमत्त्व विकसित करावे. भावनिक बदलांना समर्थपणे सामोरे जात आयुष्यातील विविध आव्हानांना योग्य तो प्रतिसाद देणे हे आजच्या काळातील गरजेचे कौशल्य आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना या क्लबच्या माध्यमातून भावनिक जागृती साधण्याचे आणि भावनिक बुद्धिमत्तेचा वापर वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांमध्ये भावनिक बुद्धिमत्तेची मूलभूत समज निर्माण करून विविध परिस्थितींमध्ये भावनिक संतुलन राखत योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे हा क्लबचा उद्देश असल्याचे समन्वयक डॉ. किशोर गायकवाड यांनी सांगितले.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना भावनिक संतुलन, आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य वृद्धिंगत करण्याची संधी मिळणार असून, हा क्लब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.
या क्लबच्या स्थापनेसाठी कार्यालयीन अधीक्षक श्री. विक्रम राजळे व करिअर कट्टा समन्वयक प्रा. चंद्रकांत पानसरे यांनी विशेष प्रयत्न केले.