महाराष्ट्र
51022
10
समृद्धीवर सुस्साट धावणाऱ्या वाहनांवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
By Admin
समृद्धीवर सुस्साट धावणाऱ्या वाहनांवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
नगर सिटीझन live 24 न्युज नेटवर्क-
समृद्धी महामार्गावर पडलेल्या दरोड्याच्या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळील घटनेत १८ लाखांच्या दरोडा प्रकरणातले आरोपी पोलिसांनी जेरबंद केले.
किरण गायकवाड, अर्जुन पवार, अशोक शिंदे, लखन काळे, धनाजी पवार, नितीन शिंदे आणि गोविंद पवार अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सिन्नरजवळ वाहनांचे टायर पंक्चर करून एका कुटुंबाला सुमारे 18 लाख रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्याचा तपास करत पोलिसांनी अवघ्या 48 तासांत हा छडा लावला आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास आणि वाहनाच्या डॅशकॅम फुटेजच्या आधारे शोध घेत बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार किरण गायकवाड याला मध्यरात्री राहत्या घरातून अटक केली. तसेच, नाशिक पोलिसांनी या प्रकरणातील 7 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच, अद्याप 5 आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
ही गुन्हेगारांची टोळी धाराशिवची आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळील समृद्धी महामार्गावर (Robbery on Samruddhi Highway) या दरोडेखोरांनी दोन वाहनातील प्रवाशांना लुटले होते. या दरोडेखोरांनी घटनास्थळापासून तब्बल 5 किमी अंतरावर स्वत:ची वाहने उभी केली होती. या गुन्हेगारांना अटक करण्यासाठी तेरखेडा, पाणगाव, खामकरवाडी आणि उमरा गावात पोलिसांनी कोंम्बिंग ऑपरेशन केले. गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही वाहनही पोलिसांनी जप्त केली आहेत.
समृद्धी महामार्गावरील वाहने भरधाव वेगाने असतानाही दरोड्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांमध्ये धाराशिवमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मात्र, सुस्साट वाहने धावणाऱ्या समृद्धीवर दरोडा कसा टाकला गेला, याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.
दरोड्याच्या घटनेनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवत ७ आरोपींच्या अवघ्या ४८ तासांमध्ये मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेतील ७ जणांना अटक केली असून ५ जण अद्याप फरार आहेत. महामार्गावर पाळत ठेवून अतिशय हुशारीने सावज कसे हेरायचे आणि लुटायचे, या गुन्हेगारांच्या मॉडस ऑपरेंडीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
बहिणीच्या घरी शिजला दरोड्याचा कट
संशयितांनी पोलिसांना आपला जबाब दिला आहे. दिलेल्या प्राथमिक कबुलीनुसार, या दरोड्याचा प्लॅन अहिल्यानगरमध्ये शिजला होता. गुन्ह्याच्या दोन दिवस आधी हे दरोडेखोर धाराशिव येथून श्रीरामपूर येथे एका साथीदाराच्या बहिणीच्या घरी आले होते. तेथेच त्यांनी समृद्धी महामार्गावरील सुरक्षेतील त्रुटी हेरल्या आणि दरोड्याचा भयानक कट रचला.
पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी नियोजन केले. दरोडेखोरांनी आपली वाहने समृद्धी महामार्गावर न नेता महामार्गाच्या खाली, रस्त्यालगत अंधारात लपवून ठेवली होती. त्यानंतर पायी महामार्गावर चढून त्यांनी सलग दोन वाहने लुटली. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात नांदेडच्या एका व्यावसायिकाने प्रसंगावधान दाखवले. त्याने स्वतःच्या पिस्तुलातून गोळीबार केला आणि दरोडेखोरांचे धाबे दणाणले. गोळीबार होताच त्यांनी अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला.
असा टाकायचे 'जाळा'! भयंकर मॉडस ऑपरेंडी
महामार्गावरून सुस्साट जाणाऱ्या अलिशान गाड्यांना रोखण्यासाठी आरोपींनी एक भयंकर मार्ग शोधून काढला होता. समृद्धी महामार्गावरील वाहनांसमोर आरोपींकडून अचानकपणे लोखंडी जॅक टाकला जायचा. त्याच वेळी ते जवळच दबा धरून बसले असायचे. गाडीचे चाक जॅकवरून जाताच टायर फुटायचा, काही वेळेस इंजिनही निकामी व्हायचे. गाडी जागीच थांबताच, वाहनाती प्रवासी खाली उतरणारच असा अंदाज होता. त्याच वेळी अंधारात लपलेले आरोपी प्रवाशांवर हल्ला करत त्यांना लुटायचे.
असे हेरायचे सावज!
इतर महामार्गांच्या तुलनेत समृद्धी महामार्गावर अलिशान गाड्यांची ये-जा जास्त असते. त्यामुळे मोठा ऐवज हाती लागेल, या आशेने त्यांनी समृद्धीची निवड आरोपींनी केली असल्याची माहिती समोर आली आहे. सुस्साट वाहने धावणाऱ्या समृद्धीवर सावज हेरण्यासाठी खास प्लॅन, अभ्यास करण्यात आला. दरोडेखोर आरोपींनी आधी समृद्धीवर ज्या ठिकाणी वाहनांचा वेग कमी होतो, असे वळण मार्ग शोधले. त्यानंतर ज्या ठिकाणी पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत किंवा ज्या ठिकाणी कॅमेऱ्यांची नजर पोहोचत नाही, अशा जागांची आधी रेकी करण्यात आली.
प्रवाशांना लुटल्यानंतर पोलिसांपर्यंत बातमी पोहचेपर्यंत सहज पळून जाता यावे, अशीच ठिकाणे आरोपींनी सावज टिपण्यासाठी निवडली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू असून दरोडेखोरांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
Tags :
51022
10




