महाराष्ट्र
14463
10
जीवे मारण्याची धमकी; तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin
जीवे मारण्याची धमकी; तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
तिसगावमध्ये अवैध धंदेवाल्यांची दादागिरी वाढली
पाथर्डी-नगर सिटीन्युज live24
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे अवैध मटका व बिंगो व्यवसाय करणाऱ्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत.
उधारीवर जुगार खेळायला लावून नंतर धमकावून पैशांची पठाणी पद्धतीने वसुली केली जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मढी येथील एका व्यावसायिकाने पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार, त्याच्या तरुण मुलाला तिसगाव येथील अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तीकडून वारंवार फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती मटका व बिंगो या अवैध व्यवसायात कार्यरत असून त्याने सदर तरुणाला या जुगाराच्या नादाला लावले. त्यातून सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांची रक्कम त्या तरुणाकडून उकळण्यात आली. ही रक्कम त्याने घरातून तसेच इतरांकडून उसने घेऊन दिल्याचे समोर
आले आहे. मात्र, एवढी रक्कम दिल्यानंतरही संबंधिताकडून आणखी पैशांसाठी दबाव व धमक्या दिल्या जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सततच्या धमक्यांमुळे तरुण प्रचंड मानसिक तणावाखाली गेला असून, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाबही उघड झाली आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी करीत संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी तिसगाव चौकात झालेल्या वादाच्या घटनेत नजीम
सय्यद याने आमच्या धंद्यात हस्तक्षेप केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देत तरुणाच्या वडिलांना शिवीगाळ केल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी विविध कलमांन्वये पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हवालदार अभयसिंग लबडे करीत आहेत. दरम्यान, तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध जुगार व्यवसायांवर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
Tags :
14463
10




