महाराष्ट्र
56463
10
पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती
By Admin
पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती; बेरोजगारांना तात्पुरती संधी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे (प्राथमिक) पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांच्या रिक्त पदांचा विचार करता भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने पात्र उमेदवारांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या सुचनेनुसार करण्यात येत आहे.
आदिवासीबहुल भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ६१ कंत्राटी उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे.
पेसा कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. याबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालाच्याअधीन राहत नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीअंती पेसा क्षेत्रातील इयत्ता १ ते ५ गटातील एकूण ५८ उमेदवार तसेच इयत्ता ६ ते ८ गटातील भाषा विषयातील ३ अशा एकूण ६१ उमेदवारांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरती नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये सुरगाणा तालुक्यात -५१, पेठ -१, इगतपुरी – २, देवळा – २, बागलाण – २, कळवण – २, दिंडोरी – १ अशा एकूण ६१ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. ही नियुक्ती पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपाची असून, नियमित शिक्षकांची नियमानुसार भरती होईपर्यंत, किंवा जास्तीत जास्त ११ महिन्यांच्या कालावधीपर्यंत अथवा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत लागू राहील. नियुक्त शिक्षकांना प्रतिमाह रु. २०,००० मानधन देय राहील. सदर नियुक्तीमुळे कोणत्याही प्रकारे नियमित सेवेत समावेशाचा अथवा इतर हक्कांचा दावा करता येणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
नियुक्त शिक्षकांनी नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नियुक्त शाळेत हजर राहणे आवश्यक आहे. तसेच, नियुक्तीनंतर १५ दिवसांच्या आत पोलीस विभागाकडून दिलेले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि एका महिन्याच्या आत शासकीय रुग्णालयातून प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. वरील बाबींमध्ये त्रुटी, विलंब किंवा दुर्लक्ष झाल्यास संबंधितांची नियुक्ती तत्काळ रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नियुक्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, शाळेतील सर्व शैक्षणिक उपक्रम, अभियान व कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीत सहकार्य करावे, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत व शालेय संसाधनांच्या जबाबदारीबाबत दक्षता बाळगणे आवश्यक आहे. नियुक्त शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शैक्षणिक व पूरक कार्य पार पाडणे बंधनकारक राहील. नियुक्त शिक्षकांच्या आचरणावर व कार्यप्रदर्शनावर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सर्वस्वी अधिकार राहतील. गैरवर्तन, हलगर्जीपणा, अनियमितता किंवा कामकाजात असमाधानकारक स्थिती आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता नियुक्ती रद्द करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी दिली.
Tags :
56463
10




