लाच घेताना महावितरणचा सहाय्यक अभियंता पकडला
शासकीय ठेकेदाराकडून घेतले पाच हजार रुपये
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शासकीय विद्युत
ठेकेदाराकडून पाच हजारांची लाच घेताना महावितरणचा सहाय्यक अभियंता राकेश पुंडलिक महाजन ( सुपा तालुका- पारनेर) याला रंगेहाथ पकडले.
येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.१५) ही कारवाई केली. याबाबत महाजन याच्याविरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर ठेकेदारास खासगी रिसॉर्टच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम मिळाले होते. सदर कामाचे अंदाजपत्रक
तयार करून देण्याकरिता सुपा (ता. पारनेर) येथील सहाय्यक अभियंता कार्यालयात कार्यरत असलेला सहाय्यक अभियंता महाजन याने ठेकेदाराकडे लाचेची मागणी केली होती. तशी तक्रार ठेकेदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी (१४ ऑक्टोबर) केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (१५ ऑक्टोबर) लाच मागणी पडताळणी केली असता, महाजन याने तक्रारदाराकडे पंचांसमक्ष पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारताना महाजन याला पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सदरची कारवाई केली आहे.