पाथर्डी- श्री गुरू सत्यविजय महाराज यांचे देहावसान- प्रविण महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा
By Admin
पाथर्डी- श्रीगुरु सत्यविजय महाराज यांचे देहावसान - प्रविण महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 21 एप्रिल 2021
वारकरी संप्रदाय हा अनेक थोर थोर तपोनिष्ठ, साधनानिष्ठ, आचारनिष्ठ महात्म्यांनी युक्त असा आहे .त्यातीलच एक म्हणजे वैराग्यमूर्ती श्रीगुरु सत्यविजय महाराज कोरडगावकर.
चैत्र शुद्ध अष्टमी वार मंगळवार
दिनांक २०/०४/२०२१रोजी महाराजांचे देहावसान झाले. महाराज म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्य, साधना, सेवा, निष्ठा या सर्वच गोष्टींचा एक अपूर्व संगम होते.तसे महाराजांचे मूळ जन्मगाव भगुर ता. शेवगाव हे होय परंतु कोरडगाव ता. पाथर्डी येथील महान विभूती वै.श्री गणपतनाना देशमुख यांच्या संगतीत महाराज बालवयापासूनच कोरडगाव येथे राहत.
नानांच्या नंतर त्यांचे सर्व पारमार्थिक नियम सत्यविजय महाराजांनी तंतोतंत पाळले ते आजन्म. त्यांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक म्हणजे श्रीक्षेत्र पंढरपूरचा चातुर्मास. तब्बल ३७ वर्षे त्यांनी श्री क्षेत्र पंढरपुरचा चातुर्मास केला.पंढरपूरातील बडवे, उत्पात, नामदास महाराज आदी सर्वच मंडळींशी प्रेमाचे संबंध होते.
पहाटे ३ वाजता सुरू झालेला त्यांचा दिनक्रम रात्री १० वाजताच थांबायचा. पहाटे चंद्रभागा स्नान, पूजा व नित्यनेम, पंढरपूर क्षेत्र प्रदक्षिणा, दर्शन, श्री राऊत बाबांचे गाथेवरील प्रवचन, देगलूरकर परंपरेतील श्री चंद्रशेखर महाराज यांचे गाथेवरील प्रवचन, भोजन, दुपारी आराम, सायंकाळी गंगेचे तीर्थ घेऊन वै. श्रीगुरु साहेबराव नाना, वै. श्रीगुरु बोधे बाबांचे भजन, श्री चैतन्य महाराज यांचे ज्ञानेश्वरी प्रवचन, असा त्यांचा दिनक्रम असायचा. आठ महिने महाराज कोरडगावी थांबत. त्यांनी गाथा, ज्ञानेश्वरी दोन्ही ग्रंथ मुखोद्गत केले नव्हे नव्हे ते दोन्ही ग्रंथ म्हणजेच त्यांचे जीवन होते, त्यांची सद्गुरु श्री जोग महाराज व परंपरेतील सर्व गुरुजन मंडळी विशेषतः श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले यांच्यावर अतोनात निष्ठा होती .महाराजांना वारकरी- फडकरी भजन, चाली म्हणण्याची विशेष आवड होती. त्यांच्या पारमार्थिक तत्वांच्या बाबतीत ते कधीही तडजोड करत नसत. तुकोबारायांचे
"*पडता जडभारी l नेमा न टळे निर्धारी"
हे वचन त्यांना तंतोतंत लागू पडले.
आयुष्याची शेवटची काही वर्षे त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हते परंतु तरीही डोळस माणसालाही लाजवेल अशा पद्धतीचे सर्वच्या सर्व पाठांतर व नियम त्यांनी कधीही सोडले नाहीत. आपल्या शारीरिक व्यंगत्वाविषयी व अंधत्वाविषयी कधीही खंत केली नाही. परंतु "जातस्य हि ध्रुवो मृत्यु:" या नियमाप्रमाणे आज वयाच्या ५६ व्या वर्षी महाराजांनी आपला देह ठेवला. त्यांचे सर्व पारमार्थिक नियम पुढे चालविण्याच्या दृष्टीने कोरडगावकर मंडळी श्री संतराम आबा घुगरे, श्री पांडुरंग जिजा वाळके, श्री रामहारी फुंदे आदी मंडळींनी सद्गुरू श्री जोग महाराज सेवा संस्थानचे मठाधिपती व महाराजांचे पारमार्थिक जिवलग स्नेही ह भ प पू श्रीराम महाराज झिंजुर्के यांच्याशी चर्चा केली व उत्तराधिकारी नेमण्याची विनंती केली. त्यादृष्टीने श्रीराम महाराजांनी सत्यविजय महाराजांचे शिष्य ह भ प प्रवीण महाराज,शेखर महाराज, नवनाथ महाराज यांना पवित्र अशा पिंपळाच्या वृक्षाच्या साक्षीने तसेच श्री संभाजी पुरनाळे, डॉ.मनोज पुरनाळे, महाराजांचे बंधू रामप्रसाद म्हस्के ,महाराजांचे भाचे श्री कानिफनाथ म्हस्के,श्री भारत म्हस्के ,साईनाथ म्हस्के,डॉ.अर्जुन फटांगरे इत्यादिंच्या साक्षीने सत्यविजय महाराजांचे ब्रह्मचारी जीवनव्रताचे नियम सांगितले व त्यांची सर्व साधना, सेवा पुढे चालविण्यासंबंधी मार्गदर्शन केले. हे सर्व नियम ह.भ.प.प्रविण महाराज घायाळ यांनी पार पाडण्याची तयारी दर्शवली व आजन्म ब्रह्मचर्य राहून महाराजांचा उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली व शेखर महाराज, नवनाथ महाराज, सर्व भगूरकर मंडळी,सर्व कोरडगावकर मंडळींनी प्रवीण महाराजांना आजीवन सहकार्य करण्याचे वचन दिले.
प्रवीण महाराजांना उत्तराधिकारी म्हणून सर्वांनी संमती दर्शवली. नंतर ह.भ.प. श्रीराम महाराज झिंजुर्के यांनी सत्यविजय महाराजांची नित्यपूजा व जपमाळ देऊन उत्तराधिकारी म्हणून प्रवीण महाराजांच्या नावाची घोषणा केली व प्रविण महाराजांच्या हस्ते वै श्रीगुरू सत्यविजय महाराजांचा पुढील सर्व अंत्यविधी पार पडला.