श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या याञेनिम्मित
By Admin
पाथर्डी तालुका- श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये भट्टी म्हणजे होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. देशात फाल्गुन महिन्याच्या प्रारंभी फक्त मढी येथेच होळीचा सण साजरा होतो . उर्वरित देशात फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सण साजरा करतात.नाथ संप्रदायाच्या प्राचीन परंपरा व श्रद्धा जोपासणारे गाव म्हणून मढीची सर्वत्र ओळख आहे. चैतन्य कानिफनाथांची येथे संजीवन समाधी असून मढीचे ग्रामस्थ यात्रा कालावधीमध्ये मंदिराच्या देखभाल, दुरुस्ती, रंगरंगोटी अशा कामासाठी सेवाभाव म्हणून योगदान देतात. त्यामुळे भट्टीचा सण लवकर साजरा करत सर्व ग्रामस्थ यात्रेच्या तयारीला लागतात. अठरापगड जातींना येथे विविध मानपान असून हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी गावाची सार्वजनिक होळी पेटविण्याचा मान गोपाळ समाजाला देण्यात आला आहे. मढीचे ग्रामस्थ या दिवशी सण साजरा करत नाहीत. भट्टीच्या दिवशी येथील घराघरांमध्ये गोडधोड स्वयंपाक होतो. नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांना महाप्रसादासाठी आवर्जून निमंत्रित केले जाते. हितचिंतक परिवार गोळा झाल्याने या दिवशी मढीमध्ये अत्यंत प्रसन्न व चैतन्यदायी वातावरण असते. कामधंद्यानिमित्त बाहेर स्थलांतरित झालेले मढीचे ग्रामस्थ शक्यतो या दिवशी आवर्जून उपस्थिती लावतात. पौर्णिमेच्या दिवशी येथील ग्रामस्थांना परिसरातील नातेवाईक, मित्रपरिवार, भोजनासाठी अवश्य बोलवतात. अशा पद्धतीने भट्टीचा सण म्हणजे सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक ठरतो. घराघरातून या दिवशी नाथांच्या गडावर वाजत गाजत गाईच्या शेणापासून बनविलेल्या गोवऱ्या आणल्या जातात. दुपारनंतर भट्टी रचण्याचा कार्यक्रम सुरू होतो. सुमारे अडीच टन गोवऱ्या एकत्रित होतात. दहा फूट उंच भव्य असे गोलाकार वर्तुळ तयार झाल्यावर तेथे नाथांचे सांप्रदायिक पूजा साहित्य ठेवले जाते. अनेक भाविक विशेषता ग्रामस्थ नाथांची कृपा राहावी, इडापिढा टळावी, यात्रा सुरळीतपणे पार पडावी, जास्तीत जास्त भाविकांची सेवा करता यावी यासाठी व मनोकामनेचे प्रतीक म्हणून तर काही भाविक नाथांना मनोकामना व्यक्त करत दोन्ही हातामध्ये नारळ धरतात. मंदिराच्या कळसाला दाखवत कपाळाला लावून आपला संकल्प सांगतात . ते नारळ भट्टीवर ठेवून देतात. साधारणता या भट्टीमध्ये एक ट्रॅक्टर ट्रॉली भर नारळे भाविकांकडून अर्पण झाली. सायंकाळी दैनंदिन शेजारती झाल्यानंतर नाथांचा जयघोष करत पुजारी, विश्वस्त वाजत गाजत शंख ध्वनी करत गडाच्या खाली अग्नी पात्र घेऊन येतात. चैतन्य कानिफनाथांचे गुरु जालिंदर नाथांची उत्पत्ती अग्नि कुंडातून झाली असल्याने काही भाविक या भट्टीला गुरूंचे प्रकट रूप मानतात. अग्नी देवाच्या माध्यमातून गुरु शिष्याची भेट व्हावी असे वातावरण अधिकच प्रसन्न वाटते. भाविकांची प्रचंड गर्दी होऊनही देवस्थान समितीकडून उत्तम नियोजन करण्यात आल्याने कुणाचीही गैरसोय झाली नाही. अनेक वर्षानंतर यंदा प्रथमच गावातील सर्व प्रमुख आजी-माजी विश्वस्त, पदाधिकारी, गावाचे प्रतिनिधित्व करत सणामध्ये सहभागी झाले. त्यामुळे नव्यानेच कार्यरत झालेल्या विश्वस्त मंडळाला सर्व ग्रामस्थांनी या निमित्ताने शुभेच्छा सुद्धा दिल्या. प्रांत अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पुण्याचे उपजिल्हाधिकारी तथा भूमिपुत्र गणेश मरकड, देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड, सरचिटणीस माधुरी मरकड, विश्वस्त उत्तम मरकड, अनिल साठे, उषा मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, माजी अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, डॉ. रमाकांत मडकर, डॉ. बाळकृष्ण मरकड, आदि सह नाथ संप्रदायाचे उपासक, वारकरी संप्रदायाचे संत, महंत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माहिती देताना देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड व सरचिटणीस माधुरी मरकड म्हणाल्या, "राज्याच्या धार्मिक व ऐतिहासिक परंपरेत मढी हे वशिष्ठपूर्ण व परंपरा जपणारी गाव आहे येथे सर्व जाती धर्मा चे भाविक नाथांनाच कुलदैवत मानतात राज्यात भटक्यांची पंढरी भटक्यांना मानपान व नाथ संप्रदायाचे उपासना मार्ग मढीच्या यात्रेतून भाविकांना दिसतात भट्टीचा सण येथील ग्रामस्थांचा आनंदाचा सण असतो. या दिवशी भट्टीचा अग्निशांत होईपर्यंत म्हणजे पहाट पर्यंत ग्रामस्थांकडून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होते. घराघरात पाहुण्यांची वर्दळ असते. सामाजिक समानतेचा संदेश देणारी मढीची यात्रा खऱ्या अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरत असल्याने राज्य शासनाने यात्रेसाठी विशेष सहकार्य करण्याची गरज आहे. येथील देवस्थान शिवछत्रपतींच्या घराण्याचे सुद्धा आराध्य स्थान असल्याने राज्याच्या विशेष श्रद्धा येथे व्यक्त होतात. येथील भट्टीसाठी म्हणजे होळीसाठी लाकडाचा वापर अजिबात होत नाही. अप्रत्यक्षपणे नाथांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत गोवंशाचे महात्म्य सुद्धा यात्रेच्या माध्यमातून वाढवले आहे. यंदा भाविकांसाठी ड्रोन च्या माध्यमातून यात्रेचे चित्रीकरण व गर्दीच्या ठिकाणी एलईडी वॉल लावल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. येत्या दोन मार्च रोजी कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला लावली जाईल. दुपारी राज्यातील गोपाळ समाज बांधवांकडून मानाची होळी पेटविल्यानंतर गावोगावचे भाविक व व्यावसायिक मढी येथे यायला प्रारंभ होईल. नाथ व वारकरी संप्रदायाचा अनोखा संगम मढी, वृद्धेश्वर व मायंबा येथील उत्सवांमधून दिसतो आगामी महिनाभर हा संपूर्ण परिसर देशातील नाथभक्तांनी गजबजून जाणार आहे.". विश्वस्त मंडळाच्या यात्रा पूर्व समन्वयाने व प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे मढी लगत असणारी धामणगाव, निवडुंगे, तिसगाव, शिरापूर, करडवाडी ही गावे यात्रेसाठी उत्साहाने व एकजुटीने सक्रिय झाली आहेत. बुधवारी रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी पारंपारिक पद्धतीने नाथांच्या जयघोषात भट्टी पेटविण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांनी होळीला म्हणजे भट्टीला प्रदक्षिणा घालत नारळ, पानफुल, पुरणपोळी अर्पण केली. येथील भट्टीची राख म्हणजे भस्म देवस्थान समितीकडून एकत्रितपणे गोळा केले जाते. त्यामध्ये नाथांच्या समाधीवरील मागील वर्षीचे सुगंधी उटणे कालवून भस्म अंगारा म्हणजेच मळी भाविकांना मागणीप्रमाणे वर्षभर दिली जाते. ही मळी अत्यंत चमत्कारिक, गुणकारी समजली जाते. तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असा भट्टीचा सण व धार्मिक एकोपा पाहून ग्रामस्थांना व देवस्थान समितीला शुभेच्छा दिल्या.
44499
10




