Ahmednagar- ऑक्सिजन जिल्ह्याबाहेर पुरवठ्याला मनाई, नगरमधील पाच उत्पादकांना जिल्हाधिकारी डाॕ. राजेंद्र भोसले यांचे आदेश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 22 एप्रिल 2021
कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी असलेली ऑक्सिजनची गरज लक्षात घेता ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सध्या जिल्हा प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे. आता याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिह्यातील पाचही लिक्विड ऑक्सिजन उत्पादक/रिफिलर यांना जिह्याबाहेर ऑक्सिजन पुरवठा करण्यास सक्त मनाई केली आहे. या पाचही कंपन्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा वैद्यकीय कारणासाठी फक्त नगर जिह्यातील रुग्णालयांना करावा, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
फेब्रुवारी महिन्यापासून जिह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. उपचारासाठी उपयोगात आणल्या जाणाऱया रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनची तूट आहे.
सध्या रेमडेसिविर इंजेक्शनची निर्मिती करणाऱया चारही कंपन्यांकडून मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा होत आहे. काळ्या बाजाराची शक्यता लक्षात घेत जिल्हाधिकाऱयांनी यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. हीच परिस्थिती ऑक्सिजनच्या बाबतीतही प्रकर्षाने आढळून येते आहे. जिह्यात सध्या काही रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने 1 एप्रिलच्या आदेशातच उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून ऑक्सिजनचा वापर करणे बंद केले आहे. सध्या बाधितांवर उपचार करण्यासाठी असलेली ऑक्सिजनची गरज आणि त्याची उपलब्ध मात्रा याचे प्रमाण व्यस्त आहे. या प्रमाणाचा मेळ घालण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे.
ऑक्सिजन उत्पादकांसोबत त्यांच्या अधिकृत डीलरमार्फत प्रशासन पाठपुरावा करीत आहे. तुटीचे हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी आता जिह्याबाहेर ऑक्सिजन पुरवठा करण्यास जिह्यातील नगर इंडस्ट्रियल गॅस, हायटेक एअर प्रॉडक्ट्स, श्रद्धा एअर प्रॉडक्ट्स (सर्व नगर एमआयडीसी), बालाजी एअर प्रॉडक्ट्स (कऱहे, ता. संगमनेर) आणि मुनोत गॅस एजन्सी (काष्टी, ता. श्रीगोंदा) या पाच ऑक्सिजन प्लाण्टधारकांना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिह्याबाहेर ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे.