महाराष्ट्र
33478
10
भारतीय सैन्य कर्तव्य दक्षतेमुळे देशातील नागरिक सुरक्षित
By Admin
भारतीय सैन्य कर्तव्य दक्षतेमुळे देशातील नागरिक सुरक्षित- प्राचार्य डॉ. बबन चौरे
आव्हाड महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची सैन्यदलात निवड
पाथर्डी प्रतिनिधी:
राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मता सुनिश्चित करणे, बाह्य आक्रमण आणि अंतर्गत धोक्यांपासून राष्ट्राचे रक्षण करणे, हे भारतीय सैन्याचे प्राथमिक ध्येय आहे. भारतीय सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अनेक खडतर प्रवासातून जावे लागते.त्यानंतरच या उमेदवारांना भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी करून दिले जाते.भारतीय जवान हे वेगवेगळ्या ठिकाणी भारताचे संरक्षण करण्याबरोबरच भारताला दहशतवादासारख्या घटनांपासून देखील वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे आज देशांतर्गत प्रत्येक नागरिक सुखाने जगू शकतो वआपला उद्योग, व्यवसाय,नोकरी अतिशय सुरक्षेने करू शकतो.भारतीय सैन्याच्या कर्तव्य दक्षतेमुळेच देशातील सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बबन चौरे यांनी केले. ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सैन्यदलात निवड झाल्याबद्दल सत्कारप्रसंगी बोलत होते.
महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलामध्ये नुकतीच निवड झाली असून यामध्ये ओमकार शिरसाट याची इंडियन नेव्ही मध्ये तसेच तुषार पाखरे, भागवत पाखरे, प्रशांत पालवे, गणेश वारे, आसाराम महारनोर, शुभम कराड, केतन गरकळ यांची आर्मी मध्ये अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय धैर्य व चिकाटीने यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी हे अतिशय गरीब व शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. हे सर्व विद्यार्थी थोड्याच दिवसात लष्करात दाखल होऊन देशसेवा करणार आहेत. देशसेवेच्या आपल्या स्वप्न पुर्तीने सर्वच विद्यार्थी आनंदित झाले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. किरण गुलदगड, एन सी सी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. अजयकुमार पालवे यांचे मार्गदर्शन लाभले, या सर्व विद्यार्थ्यांचे पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष एड. सुरेशराव आव्हाड, सर्व कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य डॉ. बबन चौरे यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किरण गुलदगड, सूत्रसंचालन डॉ. अशोक कानडे तर आभार प्रा. ब्रम्हानंद दराडे यांनी मानले.
Tags :

