हाॕस्पिटलमध्ये रुग्णांना एक बील तर आॕडीटर साठी दुसरे बील?
नगर सिटीझन live टिम- प्रतिनिधी - 21 मे,2021
अहमदनगर शहरातील काही रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे व रुग्णालयाने आपल्या मर्जीप्रमाणे आकारत असलेल्या दराप्रमाणे, अशी दोन प्रकारची बिले केली जातात. मात्र, लेखापरीक्षकाकडे पाठविताना शासनाने निश्चित केलेल्या दराचे बिल पाठविण्यात येत असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केला आहे. प्रत्यक्षात त्याप्रमाणे रुग्णाकडून शुल्क घेण्यात येत नाही. ही बाब अत्यंत गंभीर व रुग्णांची फसवणूक करणारी आहे. त्यामुळे या प्रकाराची स्वतंत्र पथक नेमून चौकशी करण्याची मागणी त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, काही रुग्णालयांनी आकारलेल्या शुल्काबाबत कोणतीही तक्रार करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याचा आरोपही शेख यांनी केला आहे. राज्य शासनाने रुग्णालयांना करोना रुग्णांसह इतर आजारांसाठी शुल्क निश्चित केले आहे. मात्र, नगर महापालिका हद्दीतील बहुसंख्य कोविड सेंटर व खाजगी रुग्णालयांकडून त्याप्रमाणे शुल्क आकारणी केली जात नाही. यातून रुग्णांची मोठी लूट सुरू असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.