वैद्यकीय क्षेत्रावर हल्ला! पुन्हा एकदा हादरले डाॅक्टर्स!
By Admin
वैद्यकीय क्षेत्रावर हल्ला! पुन्हा एकदा हादरले डाॅक्टर्स!
पुन्हा एकदा हादरले डाॅक्टर्स!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 21 मे 2021,शुक्रवार
कोरोनामुळे नातेवाईकाचा मृत्यू झाला आणि त्याचं खापर डाॅक्टरांच्या माथी फोडत संतप्त नातेवाईकांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडलीय. या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेली डाॅक्टर्स मंडळी चांगलीच हादरलीय.
मात्र हे असे हल्ले करण्यापूर्वी नातेवाईकांनी थोडासा संयम पाळायला हवाय. परंतू आजारी असलेल्या मयत नातेवाईकाच्या वियोगातून हा दुर्दैवी प्रकार घडलाय. अशा आततायीपणामुळे डाॅक्टर आणि रुग्ण ही मतभेदाची दरी आणखी रुंदावली जाईल, याचा तरी नातेवाईकांनी सारासार विचार करण्याची खरी गरज आहे.
अहमदनगरच्या तारकपूर परिसरात असलेल्या सिटीकेअर हाॅस्पिटलमध्ये परवा (दि. २०) संतप्त नातेवाईकांनी हाॅस्पिटलमधल्या डाॅक्टरांना मारहाण केली. उपचार सुरु असलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा संयम सुटला आणि त्यांनी रागाच्या भरात डाॅक्टरवर हात उचलला.
यामध्ये थोडा वेळ नातेवाईकांच्या बाजूने विचार जरी केला आणि नातेवाईकांच्या या कृत्याचं त्या भूमिकेत शिरुन जरी अवलोकन करायचा प्रयत्न केला तरी कोणता डाॅक्टर रुग्णाच्या जीवावर उठेल, हा प्रश्न अनुत्तरित राहतोच. राहिला प्रश्न ज्या सिटीकेअर हाॅस्पिटलमध्ये हा प्रकार घडला,
त्या डाॅ. संदीप सुराणा यांचा, तर हे सुराणा डाॅक्टर बिलावरुन नातेवाईकांची कधी अडवणूक करत नाहीत, एखाद्याने सत्य परिस्थिती सांगितली, विनंती केली तर हे सुराणा डाक्टर त्या रुग्णाचं बील क्षणार्धात कमी करतात, हा अनेकांचा अनुभव आहे.
या हाॅस्पिटलमध्ये भरपूर मोठा स्टाफ आहे आणि हा स्टाफ रुग्ण तसंच रुग्णांच्या नातेवाईकांशी उर्मटपणे न वागता सौजन्याने वागतो, हादेखील अनेकांचा अनुभव आहे. मात्र तरीही या हाॅस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डाॅक्टरवर संतप्त नातेवाईकांकडून हल्ला होतो,
त्या डाॅक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जाते, हे मोठं दुर्दैवी आहे. डाॅक्टर अनेक प्रकारच्या शर्थींचे प्रयत्न करुन रुग्णाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र जीवन आणि मृत्यू हे परमेश्वराच्या हातात आहे. डाॅक्टरला जरी देव म्हटलं गेलं, तरी ज्याचा मृत्यू होणारच आहे, त्या रुग्णाला वाचविण्याचा डाॅक्टरने कितीही आटोकाट प्रयत्न केला, तरी यात डाॅक्टरला यश यायलाच हवं, असा अट्टाहास काहीच कामाचा नाही.
यासंदर्भात नगर सिटीझन प्रतिनिधीनी दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असता कोरोना झालेल्या २२ ते २३ स्कोअर असलेले रुग्ण या सिटीकेअर हाॅस्पिटलमध्ये ठणठणीत बरे झाले आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल ९ हजार ९१३ रुग्ण या हाॅस्पिटलने बरे केले.
मात्र तरीही हा दुर्दैवी प्रकार घडलाच.
शेवटी कोणाची चूक होती हा पोलीस तपासाचा भाग आहे. सत्य समोर येईलच, परंतु आज तरी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा संयम ठेवण्याची गरज आहे. सध्याच्या या भयंकर परिस्थितीत डॉक्टर व रुग्ण यांच्यामध्ये समन्वय असायला हवा जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेही पोलीस व आरोग्य यंत्रणेवर सध्या खूप मोठा ताण आहे म्हणूनच थोडे संयमाने घ्या इतकच….!

