पाथर्डी- पाण्यात बूडून बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू
पाथर्डी - प्रतिनिधी
वाहून गेलेल्या बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील सुसरे गावात ही दुर्देवी घटना घडली. प्रदीप सुभाष डाके (वय १२, रा. सुसरे) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. सुसरे येथील देवीच्या दर्शनासाठी नदीतून जाणारे दोन भावंडे पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहुन गेले. त्यापैंकी एकाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले.
दुसरा भाऊ प्रदीप सुभाष डाके याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बुधवारी ही घटना घडली. सुसरे येथील प्रदीप सुभाष डाके व आदित्य सुभाष डाके हे दोन भाऊ देवीच्या मंदिराकडे जात होते. नदी ओलांडताना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यावेळी आदित्य व प्रदीप पाण्यात वाहुन गेले. जवळच कपडे धुणा-या महिलांनी आरडाओडा केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. केशव बर्डे यांनी नदीच्या पाण्यात उडी घेत आदित्य सुभाष डाके याला वाचविले. मात्र प्रदीप सुभाष डाके हा बुडालेल्या ठिकाणापासून तीनशे ते चारशे फूट अंतरावर पाण्यावर तरंगताना आढळला. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.