महाराष्ट्र
आईनेच पैशांसाठी पोटच्या मुलीला असे कृत्य करण्यास भाग पाडलं, धक्कादायक घटना
By Admin
आईनेच पैशांसाठी पोटच्या मुलीला असे कृत्य करण्यास भाग पाडलं, धक्कादायक घटना
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहाता पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. आईनेच पैशासाठी आपल्या 13 वर्षांच्या पोटच्या मुलीला परपुरुषासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं.
या प्रकरणी आई आणि 52 वर्षीय नराधामाविरोधात राहाता पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी आई आणि अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक केली आहे.
राहाता पोलीस स्टेशन हद्दीतील आणि कोपरगाव तालुक्यातील मनेगाव इथे 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईनेच पैशांसाठी ओळखीच्या माणसासोबत तिला संबंध ठेवण्यास भाग पाडले. शिवाय या घटनेची वाच्यता करु नये यासाठी तिला धमकावले. पुन्हा नराधामाकडे पाठवण्याच्या तयारीत असताना पीडित मुलीने मोठं धाडस करत आतेभावाच्या मदतीने आई आणि त्या नराधामाविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पीडितेची आई आणि अत्याचार करणारा आबासाहेब भडांगे याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
तपासात आरोपींकडून गुन्ह्याची कबुली : पोलीस
संबंधित आरोपीचं पीडितेच्या आईकडे येणं-जाणं होतं. त्यावेळी त्याची नजर मुलीवर पडली. त्याने मुलीसोबत संबंध ठेवण्याची मागणी केली असता, आईनेही संमती दर्शवली. परंतु पीडित मुलगी यासाठी तयार नव्हती. त्यामुळे तिने आतेभावाच्या मदतीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरण भादंवि कलम 376 (2) सह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली.
ही कुप्रथा बंद झाली पाहिजे : पीडित मुलगी
आमच्या समाजात (कोल्हाटी) अशा प्रथा असून मीही तेच केलं, तुलाही ते करावं लागेल असं म्हणत आईने जबरदस्ती करत मला परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. समाजातील या अनिष्ट प्रथा बंद झाल्या पाहिजेत. त्या प्रथेमुळे समाजातील इतर मुलीही बळी ठरतील. जे माझ्यासोबत झालं ते इतर मुलींबाबत हे घडू नये अशी भावना पीडितेने व्यक्त केली आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात अनेक समाजात आजही अशा कुप्रथा सुरु असून या 13 वर्षीय पीडित मुलीने धाडस करत क्रांतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. समाजातील सुशिक्षीत तरुण-तरुणींनी आता अशा कुप्रथेविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे.
Tags :
978
10