महाराष्ट्र
पाथर्डी- जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड; तपासणी अहवालाकडे वेधले लक्ष
By Admin
पाथर्डी- जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड; तपासणी अहवालाकडे वेधले लक्ष
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जवखेडे खालसा हत्याकांडात संजय, जयश्री आणि सुनील जाधव यांची उत्तरीय तपासणी औरंगाबाद येथील घाटी या शासकीय रुग्णालयात करण्यात आली होती. ही उत्तरीय तपासणी करताना कायदेशीर तरतुदींचे पालन झाले नसल्याकडे आरोपींच्या वकिलांनी लक्ष वेधले.
उत्तरीय तपासणी करणारे डॉ. हर्षल ठुबे यांच्या दोन अहवालातील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर जवखेडे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे. आरोपींच्या वतीने विधिज्ञ सुनील मगरे, नितीन मोने, छगन गवई, सिद्धार्थ उबाळे, अरूण चांदणे हे काम पाहत आहेत.
संजय जाधव यांच्यावर 19 जखमा करण्यात आल्या होत्या. पोटापासून दोन तुकडे केले होते. जयश्रीच्या अंगावर 26 जखमा होत्या. सुनीलच्या शरीराचे मुंडके, हात, पाय वेगवेगळे तुकडे केलेले होते. याबाबत डॉ. ठुबे यांनी आधुनिक आणि तीक्ष्ण हत्याराने हे तुकडे केले आहेत, असा अभिप्राय पहिल्या अहवालात नमूद केलेला होता. मृतदेहांची उत्तरीय तपासणी करताना मयतांच्या अंगावरील दागिने काढून तपासणी करावयाची असते. उलट तपासणीमध्ये जयश्रीच्या अंगावरील दागिने उत्तरीय तपासणीपूर्वी काढले नव्हते. संजय यांच्या हातातील कडेही तसेच असल्याचे मान्य केले.
पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी प्रशांत, दिलीप आणि अशोक जाधव यांच्या घरातून बांबूची काठी, कुऱ्हाड, कोयता, करवत आणि खोश्या जप्त केले. ही हत्यारे नाशिक येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविली. या प्रयोगशाळेने यावर रक्ताचे डाग नसल्याचा अहवाल दिला. त्यानंतरही पोलिसांनी पुन्हा ही हत्यारे डी. एन. ए. तपासणीसाठी पाठविली. त्यांच्या तपासणीमध्येही या हत्यारांवर रक्ताचे डाग नसल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी ही हत्यारे डॉ. ठुबे यांच्याकडे पाठवून या हत्याराने मयताच्या शरीरावर जखमा होऊ शकतात, असा अभिप्राय विचारला. त्यावर डॉक्टरांनी होऊ शकतात, असा अभिप्राय दिला आहे. ही हत्यारे बोभट आणि गंजलेली असल्याकडे वकिलांनी लक्ष वेधले. जयश्री हिच्या अंगावरील एक जखम ही ताऱ्याच्या आकाराची आहे, ही जखम स्क्रू डायव्हरने टोचल्यामुळेच होऊ शकते. खोश्याने टोचल्यावर अशी जखम होऊ शकत नसल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केला.
प्रात्यक्षिकासाठी इलेक्ट्रीकल्स कटर
जाधव हत्याकांड हे इलेक्ट्रीकल्स कटरच्या सहाय्याने केल्याचा पोलिसांचा अंदाज होता. पोलिसांनी धामणगाव देवी येथील पोपट नाना प्रधान यांच्याकडून कटर प्रात्यक्षिकासाठी आणले होते. हे कटर पुन्हा मूळ मालकाला दिले. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यातील स्टेशन डायरीला नोंद असल्याकडे लक्ष वेधले.
Tags :
36593
10