पाथर्डी तालुक्यात काळ्याबाजारात जाणारा तांदूळ पकडला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी बाजार समितीमधून तांदूळ भरलेला टेम्पो काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या तक्रारीनंतर महसूल व पोलिस अधिकार्यांनी तो पकडला. शहनिशा करून सोमवारी याबाबत कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसूल, पोलिसांनी दिली.
पुरवठा अधिकार्यांनी तांदूळ असलेला टेम्पो पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. रविवारी पंचनामा केला असून सोमवारी याबाबत पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल व पोलीस विभागाने दिली.
आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक किसन आव्हाड यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. पोलीस व महसूल अधिकारी यांना सूचना देत काळ्याबाजारात जाणारा तांदुळ पकडला. तो बाजार समितीमधील एका व्यापारी व गावाशेजारील एका व्यापार्याचा असल्याचे समजते. रेशनचा तांदुळ कमी भावात खरेदी करायचा व तो चढ्या भावाने विक्री करायचा असा उद्योग येथील काही व्यापारी करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. टेम्पो मालक, चालक व ज्याने तांदूळ भरला त्या व्यापार्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी किसन आव्हाड यांनी केली आहे.
काही ठिकाणी पोलिस तसेच पुरवठा विभागाने छापे टाकत काळ्या बाजारात विक्रीला जाणारा रेशनिंगचा तांदूळ पकडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेशनिंगचा धान्याचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याचे दिसून येत आहे.