सैराट चित्रपटातील आर्चीचा भाऊ प्रिन्सदादाला अटक होणार? फसवणूकीचा आरोप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सैराट चित्रपटातील (Sairat Movie) आर्चीचा भाऊ प्रिन्सदादा (Prince) अर्थात अभिनेता सुरज पवार (Suraj Pawar) याला अटक होण्याची शक्यता आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
याप्रकरणी संशियतांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात सुरज पवार याचाही समावेश आहे.
मंत्रालयात नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून तरुणाला पाच लाख रुपयांना गंडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावातील महेश वाघडकर या तरुणाची फसवणूक करण्यात आली. फसवणूकीसाठी चक्क भारतीय राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आला होता.
संशयित आरोपींनी सामाजिक न्याय विभागात कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात नोकरीला असल्याचं महेश वाघडकर या तरुणाला सांगितलं होतं. यासाठी सुरज पवार याने संगमनेरमधून बनावट शिक्के बनवले होते.
याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणात अभिनेता सुरज पवारचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सुरज पवारला अटक होण्याची शक्यता आहे.
महेश वाघडकर याने दाखल केलेल्या तक्रारीवरुन फसवणूक करणं, बनावट शिक्के आणि दस्तऐवेज तयार करणं या कलमान्वये संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.