श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील 10 विश्वस्त पदासाठी 276 अर्ज दाखल
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टच्या नवनिर्वाचित विश्वस्त मंडळातील 10 विश्वस्त पदांसाठी 276 व्यक्तींनी अर्ज दाखल केले आहेत, अशी महिती मोहटा देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.
देवस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी प्रसिद्ध केलेल्या प्रकटनानुसार मोहटे गावातील 5 विश्वस्त पदांसाठी 89, तर मोहटे गावाव्यतिरिक्त भाविकांतून 187 अर्ज मुदतीमध्ये प्राप्त झाले आहेत. विद्यमान विश्वस्तांचा कार्यकाळ दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी संपुष्टात येत आहे.
नवीन विश्वस्त नेमणुकीबाबत दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले होते. अर्ज दाखल करण्याची मुदत 10 सप्टेंबरपर्यंत होती. विश्वस्त पदासाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर न्या. सुधाकर यार्लगड्डा यांनी अर्जदारांची यादी देवस्थानचा सूचना फलक, तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मध्ये एकूण 15 विश्वस्त असून त्यापैकी पाच पदसिद्ध विश्वस्त आहेत. त्यामध्ये जिल्हा न्यायाधीश, उपवनसंरक्षक अधिकारी, पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे. दहा विश्वस्तांची नेमणूक दर तीन वर्षांतून एकदा करण्यात येते. दहा विश्वस्तांमध्ये मोहटे गावातील पाच व देवी भक्तांतून पाच विश्वस्तांची निवड केली जाते. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश हे मोहटा देवी देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.