अहमदनगर जिल्ह्यातील 934 शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, अवजारांच्या अनुदानासाठी ऑनलाइन सोडत
By Admin
अहमदनगर जिल्ह्यातील 934 शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, अवजारांच्या अनुदानासाठी ऑनलाइन सोडत
अहमदनगर- प्रतिनिधी
कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून शेतीअवजारांचा लाभ देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी लाभार्थी निश्चित झाले आहेत. त्यासाठी ऑनलाइन सोडत काढण्यात आली असून, नगर जिल्ह्यातील 934 शेतकऱयांना कृषी विभागाकडून शेतीअवजारांसाठी अनुदान मिळणार आहे. मात्र, यंदा तब्बल एक लाख 91 हजार 806 शेतकऱ्यांनी शेतीअवजारांच्या अनुदानासाठी अर्ज केले होते. वरिष्ठ पातळीवरच लाभार्थींची निवड होऊन त्यांच्या याद्या थेट जिल्ह्यात पाठविण्यात आल्या आहेत.
शेतीकामात यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा, यासाठी राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून शेतीअवजारे, ट्रक्टरचा लाभ दिला जातो.
यंदा प्रथमच 'महाडीबीटी' पोर्टलद्वारे शेतकऱयांकडून अर्ज मागविले होते. दरवर्षीच्या तुलनेत सहा महिने उशीर होऊनही यंदा राज्यात 11 लाख 84 हजार 243 अर्ज आले. त्यात सर्वाधिक एक लाख 91 हजार 806 अर्ज नगर जिह्यातून गेले होते. दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ पातळीवर ऑनलाइन सोडत काढून 934 लाभार्थी निश्चित करण्यात आले. त्यांच्या याद्या जिल्हास्तरावर पाठविल्या आहेत. लाभार्थींना तसे मेसेज पाठविले आहेत.
अर्ज केलेल्या शेतकऱयांच्या तुलनेत लाभार्थ्यांची संख्या मोजकी आहे. त्यामुळे लाभार्थी निवडीसाठी कोणते निकष लावले, याबाबत पुरेशी माहिती कृषी विभागातून मिळत नसल्याने, संभ्रम कायम आहे. याबाबत सातत्याने विचारणा होत असल्याने, कृषी विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
25 ट्रॅक्टरसाठी अनुदान
नगर जिल्ह्यात 56 हजार शेतकऱयांनी ट्रक्टरसाठी अनुदान मिळण्याची मागणी केली होती. त्यापैकी अकोल्यात 13, संगमनेर, नगर, राहाता तालुक्यांत प्रत्येकी दोन, तर कोपरगाव, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदे, कर्जत, पारनेरला प्रत्येकी एक ट्रक्टर मिळणार आहे.
तालुका लाभार्थी आलेले अर्ज
कोपरगाव 42 11,575
राहाता 41 7,383
अकोले 71 8,495
संगमनेर 62 10,750
शेवगाव 81 19,520
नेवासे 56 24,444
राहुरी 64 9,590
श्रीरामपूर 37 7,435
जामखेड 36 8,694
श्रीगोंदे 82 25,247
कर्जत 90 20,132
पाथर्डी 70 16,156
पारनेर 59 11,563
नगर 61 10,822