महाराष्ट्र
पाथर्डी तालुक्यात चोरट्यांच्या हल्ल्यात तिघे जखमी
By Admin
पाथर्डी तालुक्यात चोरट्यांच्या हल्ल्यात तिघे जखमी
पाथर्डी- प्रतिनिधी
चोरट्याने केलेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात तीन जण गंभीर, तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना उपचारांसाठी नगरला हलविण्यात आले आहे.
पाथर्डी शहारातील कोरडगाव रोडवरील जुना खर्डा रस्त्यावरील चांदगावला जाणार्या रस्त्याच्या आतील बाजूस असलेल्या बोरुडे वस्तीवर चोरट्यांनी हल्ला केल्याची घटना गुरूवारी (दि. 29) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेत पार्वती नामदेव बोरुडे (वय 65), देवीदास नामदेव बोरुडे (वय 40), संदिप देवीदास बोरुडे (वय 32) हे गंभीर जखमी झाले आहेत. प्राथामिक उपचार करुन अधिकच्या उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे. सुवर्णा देवीदास बोरुडे किरकोळ जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, सचिन लिंमकर यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली.
सुवर्णा बोरुडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, गुरूवारी रात्री 11:30 च्या सुमारास घरात झोपलेले असताना पती देवीदास बोरुडे यांना कुत्रे भुंकण्याचा आवाज आल्याने ते घराबाहेर गेले. मोठ्याने ओरडण्याचा आवाज आल्याने घरातील सुवर्णा बोरुडे, पार्वती नामदेव बोरुडे घराबाहेर आल्या. तूम गांजा बेचते हो, पैसे निकालो, असे म्हणत एका चोरट्याने त्याच्या हातातील चाकूचा धाक दाखवून सुवर्णा व पार्वती त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याची कर्णफुले त्याच्याकडे काढून दिली.
त्यानंतर एक चोरटा शेजारी राहणारे संदीप नामदेव बोरुडे यांच्या खोलीकडे गेला. त्यांचा दरवाजा जोरात वाजवला. त्यावेळी संदीप बोरुडे यांनी दरवाजा उघडून त्या चोरट्याचा पाठलाग करून घराच्या पाठीमागे रोडवर लाथ मारून त्याला खाली पाडले. दोन चोरटे संदीप बोरुडे यांच्याकडे पळाले. संदीप बोरुडे यांनी एका चोरट्यास खाली पाडून त्याच्या हातातील चाकू हिसकावण्याच्या प्रयत्न करून चोट्याला चांगलेच चोपले.
चोरट्याने पार्वती यांना दंडावर चाकू मारून जखमी केले. देवीदास यांच्या उजव्या पायास लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील लोक आले. त्यावेळी चोरटे पळून गेले. या घटनेत चोरट्यांनी 41 हजारांचे सोन्याचे दागिने नेले. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे हे पुढील तपास करीत आहेत.
Tags :
22080
10