महाराष्ट्र
वाचनाच्या चांगल्या सवयीमुळेच ज्वलंत कल्पनाशक्ती विकसित होतात- ज्योती आधाट
By Admin
वाचनाच्या चांगल्या सवयीमुळेच ज्वलंत कल्पनाशक्ती विकसित होतात- ज्योती आधाट
पाथर्डी- प्रतिनिधी
वैविध्यपूर्ण आणि समृद्ध शैली असलेली पुस्तके मनुष्याचे मन मोकळे करतात. सर्जनशील क्षमता प्रगल्भ करण्यासाठी हीच पुस्तके आधार बनतात. वाचन ही एक प्रेरणा असून ती तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मदत करते. महान व्यक्तींची चरित्रे आपल्याला कठोर परिश्रम करण्यास आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी समर्पित राहण्यास प्रोत्साहित करतात. वाचनाच्या चांगल्या सवयीमुळेच आजच्या युवकांमध्ये ज्वलंत कल्पनाशक्ती विकसित होतात, असे प्रतिपादन साहित्यकार व लेखिका ज्योती आधाट यांनी केले.
त्या येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित युवा संवाद २०२२ या उपक्रमांतर्गत पहिले पुष्प 'लेखिका आपल्या भेटीला'' गुंफताना आजच्या बदलत्या परिस्थितीला जबाबदार कोण? या विषयावर बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे तर व्यासपीठावर पर्यवेक्षक प्रा. शेखर ससाणे, ग्रंथपाल प्रा. किरण गुलदगड, प्रा. मन्सूर शेख, प्रा. देवेंद्र कराड, प्रा. सुरेखा चेमटे, प्रा. आशा पालवे आदी उपस्थित होते.
ज्योती आधाट पुढे म्हणाल्या, आजची युवापिढी ही नैराश्याने ग्रासली असून त्यांच्यामध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे. आजच्या बदलत्या परिस्थितीला शिक्षण व्यवस्था, सामाजिक विषमता, आजची राजकीय परिस्थिती, सोशल मिडिया, युवकांमध्ये आलेले नैराश्य, वाढती व्यसनाधीनता आदी घटक जबाबदार असले तरी यातून बाहेर पडण्यासाठी आपल्यामध्ये असणारे कौशल्य व सकारात्मक सहनशीलता आवश्यक आहे. समाज काय म्हणेल हा सर्वांना जडलेला एक रोग असून समाजाचा विचार न करता आपल्याला जे योग्य वाटेल ते केल्यावरच आजचा युवक समाधानी जीवन जगू शकतो. प्रत्येकामध्ये एक लीडरशिप हा गुण लपलेला असून यशाच्या शिखरावर जाण्यासाठी हाच गुण उपयुक्त ठरतो. प्रत्येकाने आपल्या चांगल्या दिवसाची सुरुवात 'ऑल इज वेल' या वाक्याने केल्यास नैराश्याची भावना न येता सकारात्मक विचारांची शृंखला मनामध्ये येण्यास सुरुवात होते.
पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेनुसार सुरु करण्यात आलेल्या या युवा संवाद कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयातील किशोर शेळके, अक्षदा घुले, आर्यन गर्जे, लाभश्री गांधी, सार्थक तुपे, साईप्रसाद देवढे, प्रसाद आंधळे, आरती हजारे, आदर्श जाधव, शिवानी कुटे, साक्षी कुटे या विद्यार्थ्यांनी बदलत्या परिस्थितीला कारणीभूत घटक विषद करून या युवा संवादामध्ये आपली भूमिका मांडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शेखर ससाणे, सुत्रसंचालन प्रा. मन्सूर शेख व प्रा. देवेंद्र कराड तर आभार ग्रंथपाल प्रा. किरण गुलदगड यांनी मानले.
Tags :
292
10