कर्जबाजारी शेतकर्याची आत्महत्या
7 लाखांचे व्याजासह झाले 21 लाख!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बँक, पतसंस्था आणि खाजगी सावकाराच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकर्याने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. कर्जाच्या तगाद्याला कंटाळून शेतकर्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
संभाजी विश्वनाथ बारगुजे (वय 39) असे आत्महत्या करणार्या शेतकर्याचे नाव असून, ते श्रीगोंदा तालुक्यातील घोटवीचे रहिवासी आहेत. घोटवीचे संभाजी विश्वनाथ बारगुजे हा तरुण शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता. आई व वडील भाऊ-भावजयी पत्नी असे एकत्रित कुटुंब असून तो कुटुंबातील कर्ता/कुटुंब प्रमुख होता.
खासगी सावकार घरी जाऊन वारंवार चार लोकांमध्ये मारहाण करण्याची धमकी त्यांना देत होता. बँका आणि पतसंस्था यांच्याही वारंवार जप्तीच्या नोटिसा येत होत्या. त्यामुळे या त्रासाला कंटाळून राहत्या घरी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन त्यांनी जीवन यात्रा संपविली. झोपेतून पत्नी जागी होताच पती घरात नसल्याचे दिसले. ते पाहून ती बाहेर आली.
तेव्हा घराच्या पडवीमध्ये संभाजी हे छताला लटकलेल्या अवस्थेत दिसले. आरडा ओरडा करून तिने सर्वांना जागे केले. मयत संभाजी याच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, भाऊ-भावजयी असा परिवार आहे.
7 लाखांचे व्याजासह झाले 21 लाख!
शेती विकसित करण्यासाठी एचडीएफसी बँकेकडून वडिलांच्या नावे 7 लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याचे व्याजासह सुमारे 21 लाख रुपये झाले. एका पतसंस्थेकडून दीड ते दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याच प्रमाणे एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खासगी सावकाराकडून दहा टक्के व्याजदराने 2 लाख रुपये कर्ज घेतले होते.