महाराष्ट्र
पाथर्डी- ऊसतोड मंडळ स्थापन करून स्वप्न पूर्ण केले
By Admin
पाथर्डी- ऊसतोड मंडळ स्थापन करून स्वप्न पूर्ण केले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी -ऊसतोडणी कामगारांचे कल्याण व्हावे हे स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी नियतीने माझ्यावर टाकली. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड मजूर कल्याण मंडळाची स्थापना करून व कार्यान्वित करून स्वर्गीय मुंडे यांचे स्वप्न आपण पूर्ण केले, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे संस्थापक संत नारायण बाबा यांच्या 11 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री मुंडे भाविकांसमोर बोलत होते. यावेळीतारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज, राजश्री धनंजय मुंडे, आमदार मोनिका राजळे, आमदार काकासाहेब आजबे, माजी आमदार भिमराव धोंडे, साहेबराव दरेकर, भीमराव फुंदे, माजी सभापती सुनिता गडाख, अनिल महाराज बार्शीकर, रमेश अप्पा भट्ट, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, गोकुळ दौंड, अमोल गर्जे, गहिनीनाथ शिरसाट उपस्थित होते.
मंत्री मुंडे म्हणाले, वैकुंठवासी संत नारायण बाबांनी स्वतः माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिलेला आहे.
गडाच्या विकासासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. विविध विकास कामांसाठी सुमारे आठ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. पाथर्डी माझी मावशी आहे. मावशीचा कधीही विसर पडणार नाही. तारकेश्वर गड ते पाथर्डी रस्त्याला दोन कोटी रुपये रस्ता दुपदरी करण्यासाठी देतो, अशी घोषणा मुंडे यांनी केली.
आमदार राजळे म्हणाल्या, नारायणबाबा यांचा आशीर्वाद राजळे परिवाराला होता. तिच परंपरा आदिनाथ महाराज शास्त्रींनी ठेऊन राजळे परिवारावर कायम आशीर्वाद दिला आहे. संत नारायण महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी हजारों भाविकांनी गुरुवारपासूनच गडावर गर्दी केली. नगर आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावांमधून पायी दिंड्या गडावर मोठ्या भक्तिभावाने भगवंताचे नामस्मरणाचे जतन करत मुक्कामी दाखल झाल्या होत्या.
तारकेश्वर गड पंचक्रोशीतील परिसरातील गावागावांमधून महाप्रसाद म्हणून हजारो लाडूचा प्रसाद भाविकांनी आणून दिला. गडावर आलेल्या भाविक भक्तांना प्रसाद म्हणून हा लाडू वितरीत करण्यात आला. चिंचपूर इजदे येथील डोळ्याने अपंग आणि मुंबई येथे स्टेट बॅंकेत व्यवस्थापक म्हणून काम करणारे गणेश भानुदास सोनवणे या युवकाने तारकेश्वर गडाच्या महाप्रसादासाठी दीड लाख रुपये रोख स्वरूपात देणगी म्हणून दिले.पाथर्डी येथील डॉ. स्वप्नील गर्जे व शुभांगी गर्जे यांनी भाविकांसाठी गडावर सर्व रोग निदान व दंत शिबिराचे आयोजन केले होते. अनिल महाराज पाटील बार्शीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.
Tags :
101937
10