बाबुजी आव्हाड महाविद्यालयात टॅली व मोडी लिपी अभ्यासक्रम
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त टॅली व मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु झाला असून, या अभ्यासक्रमाचे उद्घाटन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. प्रशांत साळवे, इतिहास विभागप्रमुख डॉ. अशोक कानडे उपस्थित होते.
मोडी लिपी कागदपत्राचे दस्तऐवज आज बंद अवस्थेत असून मोडी लिपीच्या माध्यमातून आपला गौरवशाली इतिहास जगासमोर आणणे आवश्यक आहे त्यासाठी शाळा महाविद्यालयातून मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे गरजेचे आहे, त्या अनुषंगाने महाविद्यालयाने सुरु केलेल्या मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक फायद्याबरोबरच इतिहास संशोधनासाठी मदत होणार आहे.टॅली प्रमाणपत्र हे अकाउंटींग प्रोफेशनल म्हणून स्वयंरोजगार मिळविण्यासाठी उपयुक्त असून कोणत्याही शाखेतील विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.
पाथर्डी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थास या दोन्ही अभ्यासक्रमांचा रोजगारासाठी फायदा होणार असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक कानडे व डॉ. प्रशांत साळवे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. विजयकुमार म्हस्के तर आभार डॉ. अर्जुन केरकळ यांनी मानले.